-“राजकारणापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे” – शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका माजी सभापती दिलीप जाधव यांची स्पष्ट घोषणा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा आणि काँग्रेस जर AIMIM सोबत युती करून निवडणुका लढवत असतील, तर सामाजिक कार्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत का जाऊ नये, असा थेट आणि परखड सवाल जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीप जाधव यांनी उपस्थित केला. साखरखेर्डा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब व माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिव–भीम गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आमदार असताना केलेली विकासकामे आजही जनतेच्या स्मरणात असल्याचे सांगत दिलीप जाधव म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करत असताना डॉ. खेडेकर यांची कार्यपद्धती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची होती. आजही ते आम्हाला सोबत घेतात; मात्र राजकीय पक्ष आडवा येत होता. आता पक्ष बाजूला ठेवून त्यांच्या सोबत काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मेहकरचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीप जाधव, भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे, तालुका प्रमुख वैभव देशमुख, एस.ई.एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सचिव चंद्रशेखर शुक्ल, सरपंच दीपक पवार, प्रल्हाद मामा ताठे, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, सौ. गीताताई संदीप मगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, संचालक राहुल काबरा, संचालक नरेंद्र डिघोळे, दिलीप इंगळे, जयराम गवई पहेलवान, माजी उपसरपंच दर्शन गवई, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, बी.के. गवई, अरुण गवई, दादाराव गवई, सुभाष गवई, सवडदचे माजी सरपंच गजानन देशमुख, उपतालुका प्रमुख दिलीप सोभागे यांच्यासह परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर म्हणाले की, साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलमधील मतदारांनी प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्य केले. मी केलेली विकासकामे सर्वांना माहिती आहेत. भविष्यातही तुमच्या सोबत राहून काम करणे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाग्यश्रीला संधी दिल्यास या भागाचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. शशिकांत खेडेकर हे असे नेतृत्व आहे की मंत्रालयात गेले की त्यांच्या खिशात विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार असते. कोणतीही विकासकामे असोत किंवा आरोग्यविषयक समस्या, ऑपरेशन, मेडिकल बिल मंजुरी यांसाठी ते थेट संबंधित मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावतात. त्यामुळे अशा नेतृत्वाला जपणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, साखरखेर्डा गावाच्या तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मांडून डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पाइपलाइन बदलण्याचे तसेच शिक्षक कॉलनीसाठी नवीन जलकुंभ उभारण्याचे काम मार्गी लावले. भोगावती व कोराडी नदीवर केटीवेअर बंधारे बांधून शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालयासाठी १८ कोटींचा निधी आणून इमारत उभी राहिली असून ते सुरू करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बाबूराव मोरे यांनी केले होते, तर सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले. शिव–भीम गीतांच्या या कार्यक्रमाला नागरिक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.