– त्र्यंबकेश्वर मार्गावर हायवाचा कहर; दुचाकीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू!
– अंत्री खेडेकर–पांग्री उबरहंडे गावांवर शोककळा; रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
चिखली (रंजना मोरे) — श्रद्धेने सुरू झालेला देवदर्शनाचा प्रवास काही क्षणांतच काळाच्या गर्तेत अडकला. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या दुचाकीवर भरधाव हायवा उलटून बसल्याने दोन तरुण विद्यार्थ्यांचे आयुष्य क्षणार्धात संपले. ही भीषण दुर्घटना 4 जानेवारी रोजी दुपारी नाशिक–त्र्यंबकेश्वर मार्गावर घडली. या अपघातामुळे चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर आणि पांग्री उबरहंडे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. अपघातात भूमी समाधान खेडेकर (वय २१) आणि शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, ह.मु. पांग्री उबरहंडे, ता. चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी समाधान खेडेकर हे सहकुटुंब सुरतहून नाशिक येथे देवदर्शनासाठी आले होते. नाशिकमध्ये आल्यानंतर कुटुंबातील तरुणी भूमी आणि तिचा आतेभाऊ शिवम हे दोघे त्र्यंबकेश्वरकडे दुचाकीवरून निघाले. इतर नातेवाईक वेगळ्या वाहनाने पुढे रवाना झाले होते.
दरम्यान, नाशिक–त्र्यंबकेश्वर मार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावर डब्बरने भरलेल्या भरधाव हायवाचा चालकाचा अचानक ताबा सुटला. त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ उतारावरून येणारा हा हायवा टिप्पर समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या सिलिंडरने भरलेल्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावल्याने उलटला. टिप्परमधील दगड दुचाकीस्वारांवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोघेही तरुण वाहनाखाली दबले गेले आणि घटनास्थळीच त्यांनी प्राण सोडले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने हायवा हटवून दोघांना बाहेर काढण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
होतकरू आयुष्यांचा अंत!
मृत शिवमचा नुकताच वाढदिवस झाला होता, तर भूमी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील होती. स्वप्नं, आशा आणि भविष्य उराशी घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या या दोन्ही तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण, चालकांची बेफिकिरी आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.