-‘शराब नही, दूध पियेंगे – मरीज नही, सशक्त बनेंगे’
मलकापूर पांग्रा (साखरखेर्डा वार्ताहर): ‘शराब नही, दूध पियेंगे – मरीज नही, सशक्त बनेंगे’ या संकल्पनेतून स्वर्गीय प्रतापराव देशमुख यांच्या पुढाकाराने सन २००० साली सुरू करण्यात आलेला व्यसनमुक्त व सशक्त समाज उभारण्याचा उपक्रम आज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू आहे. यावर्षी गावातून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शाश्वत विकासासाठी समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या गावातील पाच व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वर्गीय पत्रकार प्रतापराव देशमुख व त्यांच्या मित्रमंडळींनी सुरू केलेल्या या आधुनिक उपक्रमास त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू प्रल्हाद देशमुख व मित्रमंडळींनी त्यांच्या विचारांना कायम ठेवले आहे. ‘शराब नही, दूध पियेंगे – मरीज नही, सशक्त बनायेंगे’ या कार्यक्रमाला वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
गाव पातळीवरील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच शेती क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या गावातीलच पाच जणांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ३४ वर्ष सेवा देणारे डॉ. चंद्रकांत दाभेरे, जे “कपड्याला खिसा नसलेला माणूस” म्हणून सुप्रसिद्ध आहेत, यांचा गुणगौरव करण्यात आला.
तसेच गावातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे पत्रकार फकीरा पठाण यांना जातीय सलोखा स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मलकापूर पांग्रा येथून नवीन साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे गंगाराम उबाळे यांचेही गुणगौरव करून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. गावातील प्रगतशील शेतकरी तुकाराम वी. पंखुळे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक तुकाराम डिघोळे यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोटिंगा येथील ह.भ.प. वाघ गुरुजी होते. मान्यवरांमध्ये साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, सरपंचपती यादव टाले, गुलशेर खासाब, लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे, माजी सरपंच साबीर खान पठाण, प्रा. दिलीप नाईकवाड, लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंदारे, प्रताप मोरे, डी.एन. पंचाळ, समाधान सरकटे, पवन मगर, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, अकील ठेकेदार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महमूद यार खान, किशोर मिसाळ, भागवत देशमुख, परमेश्वर दानवे, डॉ. सुरेश डोडिया, डॉ. वाघ, डॉ. बोडखे, डॉ. टाले, डॉ. आशिष दाभेरे, रफिक मास्टर, उद्धव देशमुख, अंकुश देशमुख, शरद साळवे, गजेंद्र देशमुख, उदावंत भाऊ, ॲड. लुकमान शेख, ॲड. वसीम शेख, ॲड. गावंडे, सुनील उगले, जावेद शेख, आयुब बाबा, शरद आटोळे, प्रवीण देशमुख, अमोल देशमुख, पवन दाभेरे, गायकवाड, बीट जमादार निवृत्ती पोफळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोरे सर यांनी प्रभावी शब्दांत सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘शराब नाही, दूध पियेंगे’ या उपक्रमांतर्गत दूध वितरण करून आभार व्यक्त करण्यात आले. स्वर्गीय प्रतापराव देशमुख यांच्या पश्चातही हा आधुनिक उपक्रम सुरू ठेवण्यात येत असल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.