-चार दशकांच्या समाजप्रबोधन कार्याची दखल, कोल्हापुरात सन्मान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील नर्मदा परिक्रमा परिवाराचे मार्गदर्शक, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शुभ संकल्पनेने तसेच सद्गुरु राजाराम महाराज शास्त्री झेंडूजी महाराज परंपरेच्या कृपेने छत्रपती शाहू महाराज सभागृह, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील राष्ट्रीय कीर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार असून, भजन, काकडा, गायन व मृदंग वादनाच्या माध्यमातून त्यांनी गेल्या ४० वर्षांपासून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. शेकडो कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी समाजात प्रबोधन घडवून आणले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले असून, या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दिलीप महाराज ठाकरे हे केवळ आळंदी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण राज्यात एक सामाजिक भान जपणारे कीर्तनकार म्हणून परिचित आहेत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जनसामान्यांमध्ये रुजवून वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या उल्लेखनीय प्रबोधन कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार–२०२५ प्रदान करण्यात आला. आळंदी जनहित फाउंडेशनचे मार्गदर्शक असलेल्या दिलीप महाराज ठाकरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने आळंदीच्या वैभवात भर पडली आहे. आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी फाउंडेशनतर्फे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.