-बाजारातील गर्दीत पडलेले पाच हजारांचे पाकीट शोधून गरजू महिलेला सुरक्षित परत देत अनुजा ढोलेकर यांनी दाखविला सामाजिक आदर्श
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : वयोमानानुसार कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी घटना साखरखेर्डा येथे अनुजा ब्युटी पार्लरसमोर घडली असून, समाजासमोर माणुसकी आणि मातृत्वाची जबाबदारी काय असते याचे सुंदर उदाहरण अनुजा ढोलेकर यांनी सादर केले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, शिंदी येथील सखुबाई जनार्दन मारके या महिला शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता साखरखेर्डा येथे आल्या होत्या. त्यांना घरकुल मंजूर झाल्याने घराचे काम सुरू होते. पैशाची गरज भासल्याने त्यांनी हातातील चांदीच्या पाटल्या सोनाराकडे मोडून घेतल्या, ज्यातून त्यांना ७ हजार रुपये मिळाले. बाजारातून परत येताना त्या बाजार गल्लीतील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैलास ढोलेकर यांच्या घराजवळ थांबल्या. त्यांनी त्यातील ५ हजार रुपये एका पाकिटात ठेवले, तर उर्वरित २ हजार रुपये बाजारासाठी वेगळे काढले. मात्र पाकीट पिशवीत ठेवताना ते नकळत खाली पडले. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही आणि त्या पुढे निघून गेल्या.
काही वेळाने अनुजा ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या एका महिलेला ते पाकीट आढळले. तिने ते उचलून अनुजा ढोलेकर यांच्याकडे दिले. पाकीट उघडून पाहिल्यानंतर कोणाचे असावे, याबाबत सर्वांनाच चिंता लागली. पार्लरमधील मुलींनी अंदाज व्यक्त केला की हे पाकीट थोड्यावेळापूर्वी पाणी पिण्यासाठी थांबलेल्या आजीचे असावे.
सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे पाकीट सखुबाई मारके यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या महिला नेमक्या कोणत्या गावच्या आहेत, याचा शोध घेण्यासाठी कैलास ढोलेकर यांनी संबंधित महिलेचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यावर शिंदी येथील सरपंच अशोक खरात यांनी सदर महिला सखुबाई मारके असल्याची ओळख पटवली. तोपर्यंत सखुबाईंनाही आपले पैसे हरवल्याचे लक्षात आले नव्हते. पैसे शोधताना ते पिशवीत नसल्याचे दिसताच त्यांनी आपले पाकीट पडल्याचे सांगितले. बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असते आणि अशा वेळी पाकीट चोरीला जाण्याच्या घटना घडतात. मात्र अशा परिस्थितीतही अनुजा ढोलेकर यांनी प्रामाणिकपणाने चौकशी करून सायंकाळी सखुबाई मारके यांना पाच हजार रुपये असलेले पाकीट परत केले.
आज, २६ डिसेंबर रोजी अनुजा ढोलेकर, कैलास ढोलेकर, सरपंच अशोक खरात, पत्रकार अशोक इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गिरी यांच्या उपस्थितीत सदर पाकीट सखुबाई मारके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रोज मजुरी करून पै-पै साठवून सखुबाई यांनी चांदीच्या पाटल्या तयार केल्या होत्या. त्या पैशांचे महत्त्व ओळखून दाखवलेली ही प्रामाणिकता सामाजिक दायित्वाचे आणि एका महिलेची दुसऱ्या महिलेसाठी असलेली मातृत्वाची जबाबदारी अधोरेखित करणारी ठरली आहे.