-सिंदखेडराजा : प्रमुख राजकीय गटांची कसोटी
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन नगरपालिका निवडणूक रंगतदार झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळाला आणि दोन्ही नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला. फरक एवढाच की, सिंदखेडराजा नगरपालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे झेंडा गेली, तर देऊळगाव राजा नगरपालिका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे काका-पुतणे यशस्वी झाले.
आता लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोबल वाढले असून, भाजप, काँग्रेस, उध्दवसेना आणि शिंदेसेना यांची अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सिंदखेडराजा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महाविकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढविली, त्यात त्यांना यश मिळाले. लढत ही शेवटपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पाहायला मिळाली. शिंदेसेना स्वतंत्र लढली आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला. या निवडणुकीत शिंदेसेनेला अति विश्वास नडला. शिंपणे हे शिंदेसेनेत असताना त्यांना डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उमेदवारी नाकारली. तीच संधी साधून त्यांनी आमदार मनोज कायंदे यांच्याशी चर्चा करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. नेमकं तेच मनोज कायंदे यांना हवं होतं, ते मिळाले आणि वारे उलटे फिरले.
जिल्हा परिषद निवडणुकीत हेच डावपेच खेळले जाण्याची शक्यता आहे. आज ज्याची सत्ता आहे, त्याकडे लोक पळतात. माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सत्ता नसूनही लोक आहेत हेही नाकारता येणार नाही. दोन्ही नेत्यांकडे समाजाची ताकद आहे, परंतु इतर समाजाचा विचार न करता निर्णय घेता येणार नाही. आज मराठा समाज एक नंबरवर असला तरी, दोन नंबरवर वंजारी समाज आहे. त्यानंतर मागासवर्गीय समाज, बंजारा समाज आणि माळी समाज यांची ताकद बऱ्यापैकी आहे. याशिवाय, अठरा पगड जातींची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे “माझ्या मागे समाज आहे” या भ्रमात कोणी राहू नये.
सिंदखेडराजा मतदार संघात ११ जिल्हा परिषद गट आहेत. यापैकी पाच सिंदखेडराजा तालुक्यातील, तीन देऊळगाव राजा तालुक्यातील, दोन चिखली तालुक्यातील आणि एक लोणार तालुक्यातील गटांचा समावेश आहे. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत साखरखेर्डा, शेंदुर्जन, दुसरबीड, बीबी, देऊळगाव मही राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या, तर भाजपाने किनगाव राजा आणि शेलगाव आटोळ जिंकली होती. काँग्रेस पक्षाला सावखेडभाई, मेरा बु. मिळाले, तर सोनोशी अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. शिवसेना सिनगाव पांग्री जिल्हा परिषद सर्कलवर झेंडा फडकावला होता. अकरा पैकी पाच सर्कलवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी वर्चस्व मिळविले होते. दोन्ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. त्यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे हे मंत्री होते. डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पराभव झाल्यानंतरही मतदारांशी आपली नाळ जोडलेली आहे. माजी आमदार तोताराम कायंदे सतत जनतेच्या संपर्कात राहतात आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काही गटांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
भविष्यात महायुतीने निवडणूक लढविली तर कोणत्या गटावर कोणाला संधी मिळेल, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना यांची जागा किती असेल हे वेळ ठरवेल. शरद पवार गट आणि डॉ. राजेंद्र शिंगणे गट दोन्ही मजबूत आहेत. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनाही भविष्याची चिंता आहे. भाजपासाठीही निवडणूक सोपी नाही, कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वबळावर आपली ताकद दाखवावी लागणार आहे. अखेर, ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची कसोटी ठरणार आहे.