-कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नागापूर पुलाजवळील राजमाता व शिक्षक कॉलनीच्या अध्यक्षपदी संघर्ष साळवे, तर सचिवपदी दिलीप लेकुरवाळे यांची निवड करण्यात आली आहे. कॉलनीच्या कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष मोहसीन ढगे होते.
मोहसीन ढगे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने राजमाता व शिक्षक कॉलनीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर काल, २१ डिसेंबर रोजी कार्यकारिणी सदस्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी संघर्ष साळवे, तर सचिवपदी दिलीप लेकुरवाळे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत कोणताही बदल न करता सहअध्यक्षपदी मोहसीन ढगे, तर उपाध्यक्षपदी अमोल कणसे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये नव्याने ईश्वर जायभाये यांचा समावेश करण्यात आला आहे.नूतन अध्यक्ष संघर्ष साळवे यांनी बैठकीत सांगितले की, “कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.” या बैठकीस काही सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही सदस्य ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.