-गणेशोत्सव ते दसरा : डॉल्बी व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांना थेट ‘नो एंट्री’; आदेश मोडल्यास गुन्हा दाखल
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने डॉल्बी व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांवर कडक निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यातील गणेश स्थापना, गणेश विसर्जन, घटस्थापना आणि दसरा या सणांच्या कालावधीत मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टमचा वापर, भाड्याने पुरवठा अथवा उपलब्ध करून देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (१) अन्वये हा आदेश जारी केला असून, तो १४ सप्टेंबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील सण-उत्सवांच्या काळात डॉल्बीच्या अतितीव्र आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. डॉल्बीच्या आवाजामुळे वृद्ध व्यक्ती, रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने आदेशात नमूद केले आहे.
समज देऊनही डॉल्बी चालकांवर परिणाम नाही
डॉल्बी सिस्टम चालक व मालकांना यापूर्वी पर्यावरण कायद्यानुसार नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच बैठका घेऊन समुपदेशनही करण्यात आले. मात्र, त्यानंतरही विविध सणांच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर सुरूच राहिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे यंदा प्रशासनाने थेट प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे कान, हृदय आणि आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच ध्वनी कंपनांमुळे मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवावर विशेष लक्ष
१४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या गणेश स्थापना ते विसर्जन कालावधीत तसेच ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या घटस्थापना ते दसरा कालावधीत हा आदेश लागू राहणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे, डॉल्बी चालक आणि ध्वनीवर्धक पुरवठादारांना प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
आदेश मोडल्यास थेट कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तातडीची परिस्थिती लक्षात घेऊन हा आदेश एकतर्फी (ex parte) पद्धतीने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘डीजेचा दणदणाट की पारंपरिक वाद्यांचा निनाद?’ याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने डॉल्बीला थेट लगाम घातल्याने गणेश मंडळे आणि डॉल्बी व्यावसायिकांची मोठी अडचण होणार आहे.