-साखरखेर्डा फुलांचे तोरण आंदोलन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील श्री संताजी महाराज नगर मधील व ऐतिहासिक दगडी मज्जिद ते पोलीस स्टेशन पर्यंतचा मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन उभारले. नागरिकांनी रस्त्यावर फुलांचे तोरण लावून प्रशासनाची दुर्लक्ष करण्याची निषेधाची झळक दाखवली.
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा हे जवळपास पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव असून, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. गावामधील गल्लीबोळात रस्ते आहेत, मात्र दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचा हा मुख्य मार्ग संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. हा रस्ता मुख्य बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी महत्त्वाचा असून, मार्गावर जिल्हा परिषद कन्या शाळा आणि पोलीस स्टेशन आहे.
या मुख्य चौकातून अनेक धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका निघतात, जसे की श्री गणेश विसर्जन, श्री दुर्गा देवी मिरवणूक, शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मिरवणूक तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मिरवणूक. मोहरम मिरवणूक देखील या रस्त्याद्वारे मार्गस्थ होते. एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याची दुर्लक्ष ही नागरिकांसाठी दुर्दैवी ठरली आहे. परिसरातील नागरिकांनी रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा, या मागणीसाठी एकजूट दर्शवली आहे. २१ डिसेंबर रोजी नागरिकांनी फुलांचे तोरण लावून आंदोलन केले आणि लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली. या आंदोलनात गजानन इंगळे, गोपाल मानतकर, विजय इंगळे, गोपाल शीलवंत, सोमेश इंगळे, गणेश जैताळकर, सुनील जैन, सुधीर इंगळे, गौरव पऱ्हाड यांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.