-प्राचीन पर्वतरांग नष्ट झाली तर परिणाम संपूर्ण भारताला
दिल्ली (अवेश तिवारी) : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरही सोयरे” असे सांगणाऱ्या संत तुकारामांच्या विचारांची आठवण आज अरावली पर्वतरांगेकडे पाहताना प्रकर्षाने होते. निसर्गाला सोयरा मानणारी ही परंपरा विस्मरणात गेल्याने देशातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक असलेली अरावली आज अस्तित्वाच्या लढाईत अडकली आहे. अनियंत्रित खाणकाम, वाढते शहरीकरण, वृक्षतोड आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अरावलीचा श्वास दिवसेंदिवस घुसमटत चालला असून, त्याचे परिणाम संपूर्ण भारताला भोगावे लागण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
अरावली पर्वतरांग थार वाळवंटाचा विस्तार रोखणारी नैसर्गिक ढाल आहे. मान्सूनच्या ढगांचा प्रवाह नियंत्रित करणे, उष्णतेच्या लाटा थोपवणे आणि उत्तर भारतातील हवामान संतुलित ठेवण्यात तिची भूमिका अमूल्य आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे ही पर्वतरांग अक्षरशः पोखरली जात आहे. परिणामी, वाळवंटीकरण वाढत असून, धुळीची वादळे, तीव्र उष्णता आणि हवामानातील टोकाचे बदल अधिक तीव्र होताना दिसत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, अरावलीचा ऱ्हास म्हणजे मान्सूनच्या पावसाच्या चक्रावर थेट घाला. पावसाचे असमान वितरण, दीर्घ दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या आपत्तींची शक्यता वाढत आहे. याचा परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्नसुरक्षा आणि सामान्य जनजीवनावर होणार आहे. अरावली अनेक नद्यांची उगमस्थाने आणि भूजल पुनर्भरणासाठी महत्त्वाची असल्याने, तिच्या नाशामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.
पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” हा विचार प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे. अरावलीचे संरक्षण म्हणजे केवळ डोंगर वाचवणे नाही, तर देशाचे हवामान, पाणी आणि भविष्यातील पिढ्यांचे अस्तित्व सुरक्षित करणे आहे. कठोर पर्यावरणीय कायदे, खाणकामावर बंदी आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड याशिवाय हा ऱ्हास थांबवणे अशक्य असल्याचेही ते स्पष्ट करतात. आज अरावलीकडे दुर्लक्ष झाले, तर उद्या संपूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागेल. संत तुकारामांचा निसर्गाशी मैत्रीचा संदेश पुन्हा एकदा अंगीकारला, तरच अरावलीसह देशाचे पर्यावरण वाचू शकेल, असा गंभीर इशारा या संकटातून पुढे येत आहे.