-२२ व्या वर्षी सौरभ तायडे नगराध्यक्ष; अवघ्या दीड तासांत सत्तांतरावर शिक्कामोर्तब
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : सिंदखेडराजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणाला कलाटणी दिली असून, सत्तेचे स्पष्ट आणि निर्णायक सत्तांतर झाले आहे. रविवारी, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होताच निकालाचा वेग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जलद, तर राज्यातही वेगवान ठरलेल्या या मतमोजणीत अवघ्या दीड तासांत निकाल स्पष्ट झाला आणि साडे अकरा वाजताच अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या ऐतिहासिक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अवघ्या २२ वर्षीय सौरभ विजय तायडे यांनी नगराध्यक्ष पदावर निर्विवाद विजय मिळवत नवा इतिहास रचला. ४,२८७ मते मिळवत त्यांनी विजय संपादन केला असून, ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले आहेत. या विजयामुळे युवक नेतृत्वाला मिळालेली ही मोठी पावती मानली जात असून, सिंदखेडराजाच्या राजकारणात नव्या पिढीचा आवाज थेट सत्ताकेंद्रात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अंतिम निकाल जाहीर होताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते सौरभ विजय तायडे यांना नगराध्यक्ष पदाचे विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवाजी राजे जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवक नेतृत्वाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात असताना मतमोजणीदरम्यान चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मात्र प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवत सौरभ तायडे यांनी अखेर बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे श्याम किसनराव मेहेत्रे यांना ४,११८ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) चे अतिश बाळाजी तायडे यांना ३,४३६ मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ४६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याची नोंद झाली. नगरपरिषद सदस्यांच्या निकालानंतर सत्तासमीकरणेही स्पष्ट झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे ८ नगरसेवक, अजित पवार गटाकडे ६, शिवसेना (शिंदे गट) कडे ५ तर भाजपकडे १ नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेत शरद पवार गट निर्णायक भूमिकेत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि वेगवान पार पडली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अजित दिवटे, मुख्याधिकारी आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉ. प्रविणकुमार वराडे, माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती.
कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस दलासह सिंदखेडराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष इंगळे, दुय्यम ठाणेदार बालाजी सानप, गोपनीय विभागाचे श्रावण डोंगरे, किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर व मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात होते. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.