-अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषणादरम्यान सभागृहात तणाव; बुलढाण्याच्या विकासावरून जाब
बुलढाणा/नागपूर (बाळू वानखडे) — महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबाबत आणि गुंतवणुकीच्या आकडेवारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात मांडत असताना, बुलढाणा, मेहकर आणि संपूर्ण विदर्भाच्या वाट्याला प्रत्यक्षात काय आले, या मूळ प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच आमदार सिद्धार्थ खरात विधानभवनात संतप्त झाले. अंतिम आठवडा प्रस्तावावर सुरू असलेल्या भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट रोखत विदर्भासाठी आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्यासाठी नेमके काय मिळाले, याचा जाब विचारला.
या अचानक झालेल्या हस्तक्षेपामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार खरात हे प्रथमच विधानसभेत निवडून आल्याने सभागृहाची शिस्त व नियम पाळण्याचा सल्ला दिला. तसेच विदर्भासाठी आपण काय दिले, याची मागील काळाशी तुलना केली, तर “तोंड दाखवायला जागा राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आमदार खरात यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. “मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय केले, याची माहिती देत आहेत; मात्र विदर्भाला त्याचा किती लाभ झाला, हा खरा प्रश्न आहे. माझ्या बुलढाणा जिल्ह्याला काय मिळाले? मेहकरसाठी नेमकी कोणती ठोस तरतूद करण्यात आली?” असे थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभागृहाचे लक्ष मूळ मुद्द्यांकडे वेधले, असे त्यांनी सांगितले. आमदार खरात पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री विदर्भाचे नेतृत्व करतात आणि राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करतात, याचा अभिमान आहे; मात्र ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ज्या घोषणा करण्यात आल्या, त्याव्यतिरिक्त विदर्भ अधिवेशनात शेतकरी, युवकांचा रोजगार किंवा औद्योगिक विकासासाठी कोणतीही नवी ठोस घोषणा झालेली नाही. जुन्याच घोषणा पुन्हा मांडण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. विमानतळ, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत भविष्यातील योजनांची आकडेवारी स्वागतार्ह असली, तरी त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होणार, तरुणांना रोजगार मिळणार का आणि मागास जिल्ह्यांचा औद्योगिक विकास प्रत्यक्षात कधी होणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न सुमारे तीन लाख रुपये आहे, तर बुलढाणा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अवघे एक लाखाच्या आसपास आहे. हा प्रचंड आर्थिक दरीचा फरक नेमका कसा भरून काढणार?” असा सवाल उपस्थित करत आमदार खरात यांनी नंदुरबार, धुळे, बुलढाणा यांसारख्या मागास जिल्ह्यांना औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील पांदण रस्ते, शेतरस्ते आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकेंद्रित घोषणा केल्या जात असून, विदर्भात अधिवेशन घेऊन घोषण्या मात्र मुंबईसाठी केल्या जात असल्याचा आरोप करत, “विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार खरात यांनी व्यक्त केली. विदर्भासाठी ठोस निर्णय, शेतकरी व युवकांच्या भवितव्यासाठी स्पष्ट धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची नितांत गरज असल्याचे ठाम मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी या अधिवेशनात मांडले.
“पहिल्यांदाच निवडून आले, शिस्त पाळा! विदर्भासाठी काय केले हे सांगितले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही” – मुख्यमंत्री आमदार खरातांवर चांगलेच चिडले