-अंकुश आकाळ यांच्या घरी भरदिवसा डल्ला; शिंदे-साखरखेर्ड्यानंतर तांदुळवाडीही हादरली!
सिंदखेडराजा (राजेंद्र घुबे) – तालुक्यातील साखरखेर्डा परिसराला आता अक्षरशः चोरट्यांनी वेठीस धरले आहे! शिंदी आणि साखरखेर्डा येथे धुमाकूळ घातल्यानंतर या लुटारूंच्या झुंडीने थेट तांदुळवाडी गाठली आणि ४ डिसेंबरच्या काळोख्या रात्री सेंट्रल बँकेचे मॅनेजर अंकुश शालीग्राम आकाळ यांच्या राहत्या घरावर मोठा दरोडा टाकला. दिवसाढवळ्या राजरोसपणे घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि तब्बल ६ लाख १३ हजारांचा किमती ऐवज एका फटक्यात लंपास केला आहे.
या घटनेच्या वेळी शालीग्राम आकाळ हे कुटुंबासह कुंकवाच्या कार्यक्रमासाठी भोरसा भोरसी येथे गेले होते. ५ डिसेंबर रोजी ते किराणा सामान घेण्यासाठी साखरखेर्डा येथे आले असता पैसे कमी पडले म्हणून तांदुळवाडी येथे घरी गेले. घराचे कुलूप तोडलेले दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात प्रवेश केल्यावर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पहिल्या खोलीतील पेटी उघडून पाहिली असता त्यातील ४० हजार रुपयांची नगदी रोकड गायब होती! यानंतर त्यांनी मुलगा अंकुश आकाळ यांना तातडीने फोन करून माहिती दिली. अंकुश आकाळ यांनी आई आणि चुलत भावासोबत तांदुळवाडी गाठले. घरातील बेडरूममधील लोखंडी पेटी उघडी पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. पेटीतील ५ तोळे चांदीचे दागिने (५ हजार रुपये), लहान मुलांचे दागिने (१० हजार रुपये), ५ तोळ्याची सौभाग्यवती पोत (किंमत ५ लाख ५५ हजार रुपये) आणि ३ हजार रुपये नगदी असा एकूण ६ लाख १३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पूर्णपणे साफ केला होता. या प्रकाराने संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरखेर्डा पोलिसांनी आतापर्यंत एकाही चोरीच्या प्रकरणातील आरोपींना पकडलेले नाही. याचाच फायदा घेत चोरट्यांचे मनोबल वाढले असून, सामान्य नागरिक भीतीच्या दहशतीखाली जगत आहेत. नागरिक आता रात्री जागरण करत आहेत आणि त्यांनी थेट पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. साखरखेर्डा पोलिसांनी तातडीने आणि योग्य पद्धतीने तपास करून या चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच वरिष्ठांनी यात जातीने लक्ष घालावे, अशी आक्रमक मागणी अंकुश आकाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.