– साकेगाव हादरलं; रक्ताच्या थारोळ्यात पडला मोठा भाऊ, धाकटा भाऊ अटक
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील साकेगावात मंगळवारी सकाळी सख्ख्या भावांतील शेतीवाद अक्षरशः रक्तरंजित स्फोटात बदलला. घरातील भांडण क्षणभरात पेटले आणि शरद फकिरा इंगळे याने संतापाच्या भरात मोठा भाऊ भारत फकिरा इंगळे यांच्या पाठी–पोटात सलग चाकूचे वार झोडत थरकाप उडवला. वारांच्या माऱ्यात छिन्नविछिन्न झालेला भारत इंगळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तातडीने संभाजीनगर येथील आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या धक्कादायक घटनेनंतर जखमीची सून वैशाली इंगळे यांनी रायपूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा क्र. 235/25 नोंदवून पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश सोळंके, पोहेकॉ शितोळे, पो.कॉ. राहुल जाधव, शिंदे, कळमकर, काझी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपी शरद इंगळे याला काही तासांतच जेरबंद केले. बुलढाणा येथील फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्यानंतर पंचनामा जलदगतीने पार पडला. उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या रक्तरंजित कौटुंबिक हाणामारीने संपूर्ण साकेगाव हादरले असून गावभर एकच चर्चा— “भावानेच भावाच्या पोटात चाकू खुपसला!” हा थरकाप उडवणारा सवाल प्रत्येकाच्या तोंडी. संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव, व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश सोळंके आणि पो.कॉ. लक्ष्मण शिंदे करीत आहेत.