-चॉकलेटचे आमिष दाखवून १४ वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपीला बेड्या!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – जवळच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या साखरखेर्डा परिसरात उघडकीस आली आहे. केवळ चॉकलेट आणि वस्तूंचे आमिष दाखवून एका ३२ वर्षीय नराधम आरोपीने आपल्याच जवळच्या नात्यातील १४ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर हे क्रूर कृत्य कोणाला सांगितल्यास ‘तुझ्या भावाला ठार करेन’ आणि ‘मी स्वतः नस कापून घेईन,’ अशा भयंकर धमक्याही त्याने पीडितेस दिल्या होत्या. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, साखरखेर्डा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव भागातील पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी रोहित तेजराव गवई (वय ३२) याने पहिल्यांदा ३ डिसेंबर रोजी लव्हाळा शिवारात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी त्याने ग्राम कोलवड येथे नेऊन पुन्हा एकदा हे घृणास्पद कृत्य केले. पीडित आणि आरोपी हे एकाच समाजाचे असून, त्यांचे नातेवाईक आहेत. मात्र, नात्याची मर्यादा ओलांडून आरोपीने केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आहे. भीतीपोटी पीडित मुलीने सुरुवातीला ही घटना लपवून ठेवली होती. मात्र, अत्याचाराचा हा प्रकार असह्य झाल्यानंतर तिने ८ डिसेंबर रोजी रात्री आपल्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. त्यानंतर तातडीने पीडितेसह तिचे आई-वडील साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल झाले. ठाणेदार गजानन करेवाड यांना संपूर्ण माहिती देण्यात आली.
─────────────────────────────────────────────────────────────────────────────
गुन्हा दाखल, वैद्यकीय पुष्टी!
तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पोलिसांनी मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये अत्याचाराच्या घटनेची पुष्टी झाली. त्यानुसार, ठाणेदार गजानन करेवाड यांनी आरोपी रोहित तेजराव गवई याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) कायद्यातील कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.