-गणपती आरतीतून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न; सानप यांची ठणकावणी—“काम सुरू नाही तर मोठं आंदोलन अनिवार्य!”
लोणार (वाजिद खान) : भुमराळा–किनगावजटटू हा तालुक्यातील महत्त्वाचा डांबरी रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यांनी पोखरला असून प्रवाशांचे हाल अक्षरशः थांबण्याचे नाव घेत नाहीत. ठेकेदार आणि विभागाकडून कोणतीही दुरुस्ती न झाल्याने आज अखेर ग्रामस्थांचा संताप उसळला. भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांचे ‘पुजन’ करून गणपती बाप्पाची आरती म्हणत आगळावेगळे आंदोलन छेडले.
या अनोख्या आंदोलनात भुमराळा, वझरआघाव आणि किनगावजटटू परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा केल्या. रस्त्यातील खोल खड्ड्यांमुळे आणि टाकून दिलेल्या गिट्टीच्या गंजामुळे दररोज लहानमोठे अपघात घडत आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक आणि शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्याच हालअपेष्टा वाढल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सानप यांनी विभागास दुरुस्ती काम तातडीने सुरू करण्याचा इशारा देत लेखी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासन आणि ठेकेदाराने कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी आज अनोखी पद्धत अवलंबली. खड्ड्यांचे पुजन करीत सानप म्हणाले, “हा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षे भरकटत आहे. अधिकारी आणि ठेकेदार झोपेत आहेत. आता तरी काम सुरू झाले नाही तर अधिक मोठे आंदोलन अनिवार्य आहे.” परिसरात या आंदोलनाची मोठी चर्चा रंगली असून, अखेर प्रशासन काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आंदोलनावेळी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण धाईत, युवा मोर्चा जिल्हा सचिव राम डुकरे, तालुका सरचिटणीस भागवत मुळे, तालुका उपाध्यक्ष वैभव कापकर, सामाजिक कार्यकर्ते इमरान पठाण, नवनाथ चौधरी, गणेश सरकटे, शरद पोखरकर यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.