-आळंदीत संविधान मूल्यांचा जागर!
आळंदी (अर्जुन मेदनकर): महामानव व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आळंदी शहरात विविध ठिकाणी अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या बुद्ध विहारात झालेल्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थितांनी त्रिसरण-पंचशील धारण करून डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. सभेचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष संदीप रंधवे यांनी भूषविले.
अभिवादन सभेला माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, आवाका भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. या वेळी उपस्थित वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महान विचारसरणी, समतेसाठीची त्यांची संघर्षयात्रा आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या त्यांच्या कार्यावर मनोगते व्यक्त केली.
याच दिवशी तक्षशिला बुद्ध विहारातही महापरिनिर्वाण दिन अत्यंत धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन, बुद्धवंदना आणि त्रिसरण-पंचशील पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या संघर्षमय वाटचालीस अभिवादन केले. आयु. प्रमोद भालेराव, आयु. विलास रणपिसे, आयु. आनंद रणदिवे, आयु. नितीन थोरात आणि आयु. नामदेव सुरपल्लीकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानाचा, स्पृश्य-अस्पृश्यतेविरोधातील निर्णायक भूमिकेचा, तसेच कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी उभारलेल्या लढ्याचा आढावा घेतला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक समतेचे संवर्धन, संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि बौद्ध करुणेच्या तत्त्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी तक्षशिला बुद्ध विहार समितीचे विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब पो. भोसले, बाळासाहेब दा. भोसले, ज्ञानेश्वर रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, अशोक थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले. संपूर्ण आळंदी शहरात दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जागवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने वातावरण प्रेरणादायी बनले होते.