-ध्वजपूजन सोहळ्यात भक्तांचा उसळलेला उत्साह!
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्रीअग्रपीठाधीश्वर एवं मलुकपीठाधीश्वर पु.पु. श्री स्वामी राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज यांच्या हस्ते श्रीक्षेत्र पैठण नगरीत संतसमवेत भव्य आगमन झाले. रविवारी (दि. ७) सकाळी ७.४५ मिनिटांनी ध्वज पूजन विधी श्रद्धापूर्वक पार पडला. या सोहळ्याला आयोजक नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यासह शेकडो साधू उपस्थित होते.
नाथसंस्थानाधिपती वै. श्री भैय्यासाहेब महाराज गोसावी नगरी, नाथ समाधी मंदिर कमानीजवळ उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हा सोहळा संपन्न झाला. अध्यात्मिक वातावरण, मंत्रोच्चार आणि संतांच्या उपस्थितीने परिसर भारावून गेला. या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. सोहळ्यामुळे पैठण नगरीत धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पैठण नगरीत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना आणखी रंग चढला. नाथसंस्थान आणि पैठण परिसरात सध्या संत एकनाथ महाराजांच्या स्मरणार्थ आयोजित उपक्रम, कीर्तन-प्रवचन आणि वारकरी दिंड्यांचे आगमनही सुरू आहे. नाथ समाधी परिसर, कमानीजवळील मंडपात सकाळपासूनच भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळत होता. परिसर मंत्रोच्चारांनी दुमदुमून गेला होता, तर संतांच्या आगमनाने शहरात अध्यात्मिक वातावरण अधिकच भारावले.