– साखरखेर्डा येथे सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांचे प्रतिपादन
– संत सावता माळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – संत ही व्याख्या वेगळी आहे. संत नैराश्य दूर करून माणसात चेतना निर्माण करतात, म्हणूनच संतांचा अवतार हा समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, त्याला आरसा दाखवण्यासाठीच निर्माण झालेला आहे, असे मत जगद्गुरू पलसिध्द महास्वामी पीठाचे मठाधीपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. ते साखरखेर्डा येथे ५ डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता माळी यांचे १८ वे वंशज ह.भ.प. रविकांत वसेकर महाराज (अरणगांव), प्रकाश महाराज मगर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी प्राचार्य संतोष दसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे आणि डॉ. प्रशांत भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी, रविकांत वसेकर महाराज आणि सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संत सावता माळी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी बोलताना वसेकर महाराजांनी, मंदिर बांधणे सोपे असून पावित्र्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगून संत सावता माळी यांचे विचार प्रकट केले. पुढे आपल्या आशीर्वचनात सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, संत ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. ज्याचा संघवृत्तीशी स्पर्श झाला, त्याला संत म्हणतात. परमेश्वराचे वंशज असूनही आपण संसारात गुंतल्यामुळे विभक्त झालो आहोत. विश्वाचे अरण्य झाले असताना, संत सावता माळी यांनी मात्र आपल्या कर्मातून व कष्टातून अध्यात्माचा मळा फुलवला. त्यांनी आपल्या कर्मातच परमेश्वर पाहिला आहे. संत संसारात असले तरी मनाने परमार्थात होते. संत विवेक आणि जगण्याचा विचार देतात, या पृथ्वीवर संतांचे मोठे उपकार आहेत. “संत होण्यासाठी देहरूपी काया झिजवावी लागते. केवळ पूजा-अर्चा करून चालत नाही, कर्मामध्येच खरी भक्ती आहे. श्रम हीच पूजा आहे. जो कष्ट करतो, त्याच्या मागे परमेश्वर असतो. माणसाचे शरीर समाज, अध्यात्म आणि राष्ट्रासाठी झिजलेच पाहिजे,” असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि सोहळ्यासाठी अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर केली. सोहळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच ४ डिसेंबर रोजी, साखरखेर्डा नगरीतून संत सावता माळी महाराज यांची आणि कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.