राजरोस चोरी करून आयफोन-प्रो मॅक्स खरेदी; सोन्याचे दागिनेही जप्त!
अहिल्यानगर : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘रिलस्टार’ कोमल काळे आणि तिचा प्रियकर सुजित चौधर यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
19 नोव्हेंबर रोजी पाथर्डी–कल्याण एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. विशेष पथकाने पाथर्डी बसस्थानक परिसरात सापळा रचून 19 वर्षीय कोमल काळेला पकडले. चौकशीत तिने चोरीचा मुद्देमाल प्रियकराकडे दिल्याची कबुली दिली. त्यानंतर शेवगाव येथून सुजित चौधरला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांकडून iPhone 17 Pro Max, दुसरा मोबाईल, 6.5 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण ₹9.35 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी केलेल्या पैशातून मोबाईल खरेदी केल्याचेही आरोपींनी मान्य केले. तपासात ‘बंटी-बबली’ जोडप्याने आणखी दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून दोघांवर बीड आणि अहिल्यानगरमध्ये पूर्वीपासून गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे कोमल काळे ही सोशल मीडियावर ‘रिलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असून तिचे 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बस प्रवासात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी, असे पोलिसांचे आवाहन आहे. जिल्ह्यात बस आणि बसस्थानक परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांची गंभीर नोंद घेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि सपोनि हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.