– प्रांतिक तैलिक महासभा बुलढाणा जिल्ह्याची बैठक उत्साहात!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कार्यकारिणीचा अध्यक्ष कोण आहे, यापेक्षा सामाजिक कार्याची जाण असलेला नेता समाजाला लाभला तरच समाजाची प्रगती होते, असे मनोगत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अमरावती विभागीय सचिव रमेश आकोटकार यांनी मांडले. १६ नोव्हेंबररोजी मेहकर येथील संत संताजी जगनाडे महाराज कॉन्हेटमध्ये आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा बुलढाणा जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सचिव रमेश आकोटकार, मधूकरराव गायकवाड, डॉ. गंगाधर क्षीरसागर, श्रीकृष्ण वाघमारे, सुभाष बबनराव देव्हडे, ब्रेकिंग महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे, विजय सोनुने, महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत, ज्ञानदेव क्षीरसागर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत संत संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन करण्यात आले.
आकोटकार म्हणाले, की समाजाचा नेता असा हवा की त्याला सामाजिक कार्याची, अडचणीची आणि आरक्षणाची जाणिव असली पाहिजे. समाजाचे कार्यकर्ते जिल्ह्यात नेते आले की त्यांच्या स्वागतासाठी पुढे सरसावतात, पण नेत्याला समाजाच्या लोकांसमोर यायला वावडे वाटत असेल तर असले नेते काय कामाचे! त्यापेक्षा माजी खासदार रामदासभाऊ तडस साहेबांच्या कानावर जरी माहिती गेली तर ते समाजाच्या लोकांसमोर येऊन अडचणी समजून घेत असत आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही सामाजिक कार्याला प्रथम महत्व देतात. आपल्या अडचणी समजून घेतात आणि लगेच पाठपुरावासुध्दा करतात. आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका सुरु झाल्या आहेत. जेथे कोठे समाजाची ताकद आहे, सामाजिक कार्य करण्याची धडाडी आहे, निवडून येण्याची क्षमता आहे अशा ठिकाणी उमेदवारी दाखल करा, पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी माहितीसुध्दा त्यांनी दिली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत यांनी आपले विचार मांडताना सामजिक काम करीत असताना अडचणी येत असतात पण त्या अडचणींवर मात करून काम केलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो. शेगाव येथील श्रीमंत योगी गजानन महाराज यांच्या मायभूमित समाजातील वधू-वर मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शेकडो युवकांचे विवाह जुळले. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे याची दूरदृष्टी ठेवावी असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, ज्ञानदेव क्षीरसागर, डॉ.गंगाधर क्षिरसागर यांनीसुध्दा आपले विचार मांडले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी गठीत करण्याचा ठराव विभागीय सचिव रमेश आकोटकार यांनी मांडला. त्याला सर्व समाज बांधवांनी एकमुखी पाठिंबा देत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष बबनराव देव्हडे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानदेव क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष विजय सोनुने सचिव म्हणून नंदकिशोर गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख म्हणून अशोक इंगळे यांची अविरोध निवड करण्यात आली. उर्वरित जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे हे करतील, अशी जबाबदारी देण्यात आली.