– मेहकरात पुन्हा कासमभाई गवळी लढणार; सिंदखेडराजात सौरव तायडेंना डॉ. शिंगणेंकडून उमेदवारीचे बळ!
बुलढाणा (राजेश लोखंडे) – नगरपालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जोरदार राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. ऐनवेळी उमेदवारी कापल्यानंतर आधीच सावध असलेल्या उमेदवारांनी राजकीय कोलांटउडी मारत दुसर्या पक्षाचे तिकीट घेतले. बुलढाण्यात पुन्हा एकदा सौ. पूजाताई संजय गायकवाड या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या असून, आ. संजय गायकवाड यांना महायुतीतूनच भाजपचा विरोध पाहाता, बुलढाण्याची निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. तर सिंदखेडराजात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सौरव तायडेंना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देऊन सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षांनी अध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत ही यादी जाहीर करण्यात आल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले. ज्या नगरपरिषदांसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : बुलडाणा – सौ. लक्ष्मीताई दत्ता काकस (काँग्रेस), चिखली – काशिनाथ आप्पा बोंद्रे (काँग्रेस), मेहकर – कासम पिरू गवळी (काँग्रेस), लोणार – सौ. मिरा भूषण मापारी (काँग्रेस), मलकापूर – अतिकउर रहमान जवाहरी (काँग्रेस), नांदुरा – सौ. महेश चांडक (शहर विकास आघाडी), जळगाव जामोद – गजानन सूर्यवंशी (काँग्रेस), शेगाव – प्रकाश एकनाथ शेगोकार (काँग्रेस), खामगाव – सौ. स्मिता किशोर भोसले (काँग्रेस), सिंदखेडराजा – सौरव विजय तायडे (राष्ट्रवादी – शरद पवार), देऊळगावराजा – नेहा बलवंत सुंगट (शहर विकास आघाडी). सात जागांवर काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले असून, स्थानिक पातळीवर या उमेदवारी झाल्याने निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीची स्थानिक पातळीवरील राजकारणात मात्र चांगलीच फाटाफूट झाल्याचे दिसून येत असून, दुसरीकडे, महाआघाडीतदेखील तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे या निवडणुका चांगल्याच चुरशीच्या ठरणार आहेत.