– भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर!
– काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने प्रा. गावंडेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
– भाजपला एकटे पाडण्यात काँग्रेसची राजकीय रणनीती यशस्वी?
चिखली (राजेश लोखंडे) – नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठीची लढत आणखी रोमांचक होणार आहे. शहरातील तीन प्रमुख राजकीय पक्ष भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती व महाआघाडीत जोरदार चुरस दिसत असून, काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर प्रा. गावंडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी प्राप्त केली. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व वंचित आघाडीची युती असल्याने अल्पसंख्यांक समाजाची मते चांगलीच परिणामकारक ठरणार आहे. तर भाजपसोबत असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाने भाजपची साथ सोडल्यात जमा असल्याने भाजपसमोर ही निवडणूक जिंकण्याचे मोठे राजकीय आव्हान आहे.
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या उच्च शिक्षीत डॉ. संध्या कोठारी यांची भाजपने ऐनवेळेवर उमेदवारी नाकारून माजी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते काशिनाथआप्पा बोंद्रे यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. चिखली शहरात असलेला त्यांचा मजबूत जनसंपर्क आणि संघटन कौशल्यांचा पक्षाने विचार केला असल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेस मध्ये नगराध्यक्षपदासाठी शर्यतीमध्ये असलेले परंतु ऐनवेळी पक्षांनी उमेदवारी नाकारलेले प्रा.नीलेश गावंडे यांना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)तर्पेâ अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांची सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सक्रियता आणि शहरातील विविध प्रश्नांवरील त्यांची भूमिका लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे दिसून येत आहे. तर चिखली नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मराठा समाजातून दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार रिंगणात उतरवले आहे. यामुळे मतांचे विभाजन कसे होणार हे बघणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. तर यावेळी वंचित आघाडीने काँग्रेससोबत युती केल्याने काँग्रेसची ताकद वाढली असून, राज्यात भाजप सोबत असणारी शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी भाजपसोबत असलेली युती स्थानिक स्तरावर तोडून सर्वच प्रभागात उमेदवार उतरवणार असल्याचे चित्र आहे, यामुळे याचा फटका थेट भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता अल्पसंख्यांक मतांचे विभाजन करण्यात जो सक्षम ठरणार व जो मतदारांना आपल्याकडे आकर्षित करेल त्या बाजूने निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे तरी प्रथम दर्शनी दिसून येते.