– तहसीलदारांच्या निष्क्रियतेमुळे माफियांचा हुकूमशाही कारभार सुरूच!
– महसूल मंत्र्यांच्या कडक आदेशानंतरही जिल्हाधिकाऱ्यांची मौन भूमिका!
– राजकीय दबावामुळे कारवाई थांबवल्याची जनतेत जोरदार चर्चा!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – देऊळगावराजा तालुक्यातील अवैध रेतीउत्खनन थेट प्रशासनाच्या डोळ्यासमोरून सुरू असून, महसूल विभागातील निष्क्रियतेमुळे रेतीमाफिया अक्षरशः दिवसाढवळ्या रेतीची लूट करत आहेत. खडकपूर्णा धरण परिसर, नारायणखेड, सावंगी टेकाळे, साठेगाव आणि डिग्रस येथील नदीपात्रातून ट्रॅक्टर–डंपरचा अखंड ताफा रेती बाहेर नेत असलेले दृश्य सर्वत्रच दिसत आहे. या सर्व परिस्थितीत देऊळगावराजा तहसीलदार सौ. वैशाली डोगरजाळ यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, स्थानिक नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या मते अवैध रेतीवरील हा संपूर्ण व्यवहार मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीवर आधारित असून काही संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच या माफियांचे धंदे जोमात सुरू आहेत. “पैसा दिला की गाडी सुटते” अशी उघडीपणे चर्चा तालुक्यात सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने अनेक वेळा कारवाई करून वाहने जप्त केली असली तरी महसूल विभाग मात्र झोपेतच असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. तहसीलदार डोगरजाळ यांच्या निष्क्रीय वागणुकीमुळेच रेतीमाफियांचे मनोबल वाढल्याचा आरोप होत आहे. राज्यातील अवैध रेती व्यवहारावर लगाम लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश जारी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा प्रकरणात जिल्हाधिकारी कारवाईपासून दूर राहात असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की “राजकीय दबावामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई टाळली जाते” ही चर्चा सध्या तालुक्यात प्रचंड जोरात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. खडकपूर्णा धरण व नदीपात्रातील अव्याहत रेतीउत्खननामुळे पर्यावरण, पाण्याचा साठा आणि शेतीवर गंभीर परिणाम दिसून येत आहे. “धरण लुटलं जातंय, नदी निर्जीव केली जातेय… आणि अधिकारी मात्र गप्प! हा कोणाचा कारभार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अवैध रेतीउत्खनन प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करून देऊळगावराजा तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ शिस्तभंग कारवाई करावी व रेतीमाफियांच्या संपूर्ण रॅकेटवर गुन्हे नोंदवून कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 35 लाखांहून अधिकचा अवैध रेती वाहतुकीचा मुद्देमाल जप्त!
बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आज मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. तब्बल ₹35 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करत अवैध रेती वाहतुकीला चोख लगाम लावण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना, खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिग्रस शिवार परिसरात नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाचा एक टिपर समोरून येताना दिसला. टिपरला पंचासमक्ष थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे 4 ब्रास अवैध रेती (किंमत सुमारे ₹40,000) आढळली. टिपर चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याने, टिपर किंमत ₹35 लाख आणि रेती किंमत ₹40,000 असा एकूण ₹35,40,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन अंढेरा येथे अपराध क्रमांक /2025 नुसार कलम 303(2) BNS सहकलम 21(1), 21(2) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी दिली असून आरोपीला पोलीस ताब्यात घेण्यात आले आहे.