– नवले ब्रीजवर पुन्हा एकदा भीषण अपघात; वाहनांना आगी लागल्याने सातारा-मुंबई लेन पूर्णपणे ठप्प!
पुणे (शर्वरी जोशी) – पुणे ते बेंगळुरू द्रूतगती महामार्गावरील नवले पुलावर झालेल्या भीषण व विचित्र अपघाताने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. आज (दि.१३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात, ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्याने समोरून जाणार्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर वाहनांना आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या द्रूतगती महामार्गावरील नवले पुलावर कायमच विचित्र असे अपघात होत असतात. ज्यामुळे हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. याच पुलावरच तीन वाहनांची विचित्र घडक बसली. दोन कंटेनरची एकमेकांना धडक झाली तर यामध्ये एक कार अडकली, ज्यानंतर या वाहनांना आग लागली. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार, ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या राजस्थान पासिंगचा हा कंटेनर सातार्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ब्रेक फेल झाल्यानंतर या कंटेनरने घटनास्थळाच्या दोन किलोमीटर अंतर आधीपासूनच वाहनांना धडक देत येण्यास सुरुवात केली होती. या धडकेत तब्बल ४० ते ५० वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. या कंटेनरने नवले पुलावर साधारण ७ ते ८ वाहनांना धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या अजून एका कंटेनरला धडक दिली. या धडकेमध्येच दोन कंटेनरच्यामधे एक कार आली. ज्यानंतर यातील एका वाहनाचा स्फोट झाला आणि त्यानंतर तिन्ही वाहनांना मोठी आग लागली. यामध्ये जी कार दोन कंटेनरच्या मध्ये अडकली गेली, त्या कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर या ब्रेकफेल कंटेनरने एका कंपनीच्या बसलासुद्धा धडक दिली. ज्यानंतर ही बस पलटी झाली. यामधील सर्वच कंपनी कामगार गंभीर जखमी झाले, ज्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते.
नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये अनेकजण जखमी आहेत. सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. नवले पुलावरील सातार्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, मुंबईहून सातार्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामुळे सातारा ते मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली असून, महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.