– २७ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागणार?
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असताना आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सूरू होणार आहे. यासाठी येत्या दि.२७ नोव्हेंबररोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनीदेखील व्यक्त केली आहे.
ओबीसी आरक्षणासह इतर कारणावरून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दि.३१ जानेवारी २०२६ च्याआत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामळे निवडणूक आयोगासह प्रशासन कामाला लागले आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. यासाठी दि.२ डिसेंबररोजी मतदान होणार असून, दि.३ डिसेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीही गट व गण रचना झाली असून, आरक्षणही काढण्यात आले आहे. मतदारयाद्या पडताळणीचे कामदेखील युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता येत्या २७ नोव्हेंबरच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनीदेखील व्यक्त केली आहे.