– धरण मार्गावरील अडथळ्यांमुळे उसाच्या ट्रकांची गती खुंटली; अवैध रेती रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच : प्रा. संजय खडसे
– धरणातील प्रकल्प अधिकारी यांना शेतकऱ्यांचे उसाचे ट्रक तात्काळ सोडण्याचे आदेश!
– पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा रोष; तातडीने उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यात उसाचा हंगाम सुरू असून खडकपूर्णा धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. बायगाव, मंडपगाव, गारखेड, सुलतानपूर आणि चिचखेड या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली असून सध्या हार्वेस्टिंगला वेग आला आहे. मात्र, उसाचे भरलेले ट्रक कारखान्याकडे नेताना वारंवार अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
धरणाखालून जाणारा रस्ता हा या भागातील शेतकऱ्यांसाठी एकमेव वाहतूकमार्ग आहे. देऊळगाव महीमार्गे जाणारा पर्यायी मार्ग गावात अरुंद असून विद्युत तारा खालून गेल्यामुळे उसाने भरलेले उंच ट्रक तेथून जाऊच शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना धरण क्षेत्रातील मार्गच वापरण्याची अपरिहार्यता येते. परंतु या मार्गावर धरण प्रकल्प अधिकाऱ्यांकडून उसाचे ट्रक थांबवले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी धरण क्षेत्रात अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणातील कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, असे ठाम निर्देश दिल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तथापि, प्रत्यक्षात उसाचे ट्रक अडकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. मजूरखर्च वाढणे, उसाचे वजन कमी होणे, गाळप वेळेत पोहोचता न येणे आणि ट्रक रांगेत अडकून राहणे— या सर्वांचे दडपण शेतकऱ्यांवर येत आहे. या परिस्थितीवर शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे— धरणमार्गावरील अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत आणि पर्यायी रस्त्याची कायमस्वरूपी सोय करावी. शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन उभारेल. ही समस्या गंभीर बनत असून शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याची मागणी सर्व स्तरांतून वाढत आहे.