– क्रूझर गाडी खरेदीत झाली फसवणूक; फायनान्स कंपनीनेही केला मानसिक, आर्थिक छळ!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून थोड्याच अंतरावर असलेल्या गुंज येथील विठ्ठल मोतीराम तुपकर (वय ३०) या शेतकरीपुत्राने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, दि. १ नोव्हेंबररोजी सकाळी उघडकीस आली. क्रूझर गाडी खरेदीत फसवणूक झाल्याने व फायनान्स कंपनीने मानसिक व आर्थिक छळ केल्याने त्यांनी हे टाेकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर असे, की विठ्ठल मोतीराम तुपकर हा रात्री घरून निघून गेला होता. सकाळी त्याचे वडील मोतीराम तुपकर त्याला शोधण्यासाठी शेतात गेले असता विठ्ठल हा लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. मागील वर्षी त्याने बँकेचे कर्ज काढून आणि स्वतःजवळील पैसे टाकून नंदूरबार जिल्ह्यातील एक क्रूझर गाडी खरेदी केली होती. मात्र पूर्ण पैसे दिल्यावरही क्रूझर मालकाने फायनान्सचे कर्ज भरले नाही. वारंवार फायनान्स कंपनीची माणसे कर्जवसुलीसाठी विठ्ठल तुपकर यांच्याकडे येत असत आणि वाहन ओढून नेण्याची धमकी देत असत. यानंतरही त्याने दोन लाख रुपये कंपनीला दिले. परंतु, नंदुरबार येथील मूळ वाहन मालक उर्वरित रक्कम फायनान्स कंपनीला देण्यात टाळाटाळ करीत असे, आणि खरेदी केलेले वाहन नावी करण्यास टाळाटाळ करीत होता. याबाबत त्याने आपली फसवणूक झाली असे लक्षात आले. त्याने साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारसुध्दा केली होती. त्यावर ठाणेदार गजानन करेवाड यांनी तोडगा काढण्यासाठी मूळ मालकाला फोन लावून हे प्रकरण तत्काळ मिटविण्याचे सांगितले होते. यावर काही दिवस झाले तरी मूळ वाहन मालक उर्वरित रक्कम फायनान्स कंपनीला दिली नाही. वारंवार फोन करुनही तो आला नाही. आपली फसवणूक झाली या विवंचनेत सदर शेतकरीपुत्राने आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. विठ्ठल हा संभाजीनगर ते साखरखेर्डा मार्गावर प्रवासी वाहन चालवित होता. उत्तरीय तपासणीनंतर त्याचेवर शोकाकुल वातावरणात गुंज येथे आज, दि. १ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्च्यात आई, वडील एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.