– करवंड आणि पळसखेड सपकाळ येथील घटना
– शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
चिखली (राजेश लोखंडे) – करवंड येथील शेतकरी दत्ता लहाने हे शेतात सोयाबीन सोंगायला गेले असता, सोयाबीन सोंगत असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला, तसेच शेजारी असलेल्या शेतात फवारणी करत असलेले रोहिदास राठोड यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यात अस्वलाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून वारंवार वन विभागाकडे मागणी करूनही वन विभागाने कोणत्याही प्रकारचा जंगली प्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने परिसरातील शेतकरी आणि शेत मजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाचे अधिकारी शेतकर्यांना फाडून खाण्याची वाट पाहत आहे का? असा तिखट आणि संतप्त सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. तर या आधी झालेल्या घटनेची जखमी शेतकरी आणि शेत मजूर यांना कवडीचीही मदत वन विभागाकडून मिळालेली नाही. तरी वन विभागाने लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी आणि शेतमजूरांनी केली आहे.