– चिखलीतील खामगाव चौफुलीवरील भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही!
चिखली (राजेश लोखंडे) – चिखली शहरातील खामगाव नाक्याजवळ एक बोलेरो पिकअप वाहन आज सकाळी अपघातग्रस्त झाले. हैद्राबादवरून जळगावच्या दिशेने मासळी घेऊन जाणारे हे वाहन बोलेरो पिकअप (क्र. एमएच १९ सीएक्स २२८६ ) अचानक अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला पलटल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त बोलेरो (पिकअप) वाहनात मोठ्या प्रमाणात मासळीची खेप भरलेली होती. वाहन वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन चालक आणि त्याच्यासोबत प्रवास करणारे सर्व जण सुखरूप असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आसपासच्या स्थानिक नागरिकांनी आणि मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि रस्त्यावर पडलेला मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. या संपूर्ण घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाहन रस्त्याच्या कडेला बाजूला करून वाहतुकीस पूर्ववत सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि मदतीच्या वृत्तीमुळे एक मोठा अपघात टळला असून, त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक व्यक्त केले जात आहे.