– पांग्री काटे येथे सहकारमहर्षि स्व. भास्करराव शिंगणे स्मृतिदिनानिमित्त कीर्तन सेवा!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – या देशाला तारणारी आणि संस्कृतीचे रक्षण करणारी ज्ञानेश्वर माऊली होती, आपली संस्कृती टिकावी म्हणून तुकाराम महाराज यांनी गाथा लिहून ठेवली. दररोज पाच मिनिटे यांचे वाचन करा, आपले दुःख नाहिसे होईल. ज्ञानेश्वरी आणि गाथा ही जगाची श्रीमंती आहे, असे प्रबोधन हभप. सोपान महाराज शास्त्री यांनी काल पांग्री काटे येथे केले.
सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य काटे यांनी हभप. सोपान महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, दिनकरराव देशमुख, नितीन शिंगणे, संतोष शिंगणे, दिलीप काटे आदी उपस्थित होते. कोर्टाचा दरवाजा एक असतो पण त्या दरवाज्यातून नेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. जेव्हा जज जातात तेव्हा त्याच्या मागेपुढे शिपाई असतात. त्यांना सन्मानानं नेल्या जाते आणि त्याच्या खुर्चीवर त्याला बसवलं जात, पण तो कोर्टाचा दरवाजा पाहण्याची इच्छा आपल्याला नसते. इच्छा नसताना त्याच दरवाजातून त्याच्या मनाविरुद्ध त्याला हातकडी लावून नेल्या जाते, फरक एवढाच जेव्हा संत महात्म्य जातात तेव्हा ते सन्मानाने जातात आणि जेव्हा आपल्याला नेलं जाते तेव्हा आपली इच्छा नसताना आपल्या मनाविरुद्ध त्याच दरवाजातून आपल्या हातकडी लाऊन घेऊन नेल्या जात. आपली इच्छा नसताना आपल्याला लोक घालवायला तयार आहेत लक्षात ठेवा, जो आलेला आहे तो जाणार नाव तर दोन्हीकडे मिळत असतं, चांगलं केलं तरी नाव मागे राहतं वाईट केलं तरी नाव मागे राहते, जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढे औरंगजेबसुद्धा प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे त्यांना त्रास देणारी रामेश्वर भट्ट ही प्रसिद्ध आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध आहे त्यांच्या जेवणात शेण कालवणारेसुद्धा प्रसिद्ध आहे. जोडून नाव घ्यावाच लागतं नाव दोन्हीकडे मिळताना चांगलं केलं तरी नाव मागे राहत वाईट केलं तरी नाव मागे राहतं. झाड लावायचं काम करणे फळाची अपेक्षा न करणे उत्तम, शिवाजी महाराज डोळ्यांनी नाही पाहिले. माणसाला ऊर्जा का मिळते शिवाजी महाराज जरी डोळ्यांनी पाहिले नसतील त्यांचे पावणे चारशे किल्ले आजही डोळ्यांनी पाहायला मिळतात. वयाच्या पन्नास वर्षात पावणे चारशे किल्ले जोक आहे का? महाराजांचे एक कर्तृत्व मागे आहे. भाग्यवान आहात तुम्ही या जिल्ह्यात राजांच्या आईचा जन्मस्थान आहे. सरकारमहर्षी भास्करराव शिंगणे साहेब यांनी सर्वप्रथम शासकीय उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांच्या विरोधात आज एखादी पोस्ट करा कधी भूकंप होईल हे सांगता येत नाही, असे मार्मिक प्रबोधन शास्त्री महाराजांनी आपल्या कीर्तनातून केले. यावेळी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी केलेली कामे चिरकाल स्मरणात राहतील अशी आहेत. राजकारण आणि समाजकारण करताना सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या आहेत. उमेदवार कोण निवडायचा याची कसरतच असते. पण निवडून कोण येईल याचाही विचार करावा लागतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिम नवाज राही यांनी केले. तर संचलन सुधाकर पर्हाड यांनी केले.