– नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना पुराचा धोका!
– टाकरखेड भागिले पुलावर पाणी; नव्या पुलामुळे वाहतूक सुरूळीत!
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (सुरेश हुसे) – जिल्ह्यात सुरू असलेले अतिवृष्टीने खडकपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला असून, प्रकल्पाचे सर्वच्या सर्व म्हणजे १९ वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. १२ वक्र दरवाजे एक मीटरने तर उर्वरित ७ दरवाजे दीड मीटरने सुरू करण्यात आल्याने २४७३.५४ घनमीटर प्रतिसेंकदने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधारा पुलावरून पाणी वाहू लागले असून, देऊळगावमही – देऊळगावराजा मार्गावरील टाकरखेड भागिले येथील जुन्या पुलावरूनदेखील पाणी वाहू लागले होते. परंतु, नव्या पुलामुळे या मार्गावरील वाहतूक सुरूळीत सुरू होती.
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह खडकपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काल रात्रीच हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला गेल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात झाली होती. सकाळी ६ वाजल्यापासून ११ वक्रद्वार उघडण्यात आले, मात्र खडकपूर्णा जलाशयात पाण्याची आवक वाढत असल्याने दुपारच्या सुमारास एकूण १२ दरवाजांतून एक मीटरने आणि ७ वक्रद्वारांतून प्रत्येकी दीड मीटरने जबरदस्त विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधार्याच्या पुलावरून २००६ नंतर पहिल्यांदाच पाणी गेले असून, देऊळगावराजा – देऊळगावमही दरम्यानचा खडकपूर्णा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले होते. परंतु, नवीन पुलामुळे वाहतूक सुरूळीत होती.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वच प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आलेत. नदीपात्रात मोठ्या ८७ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निमगाव वायाळ कोल्हापुरी बंधारा, राहेरीचा नवीन पूल, लिंगा–देवखेड कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली गेला आहे. तहसीलदार अजित दिवटे व उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे अधिकारी यांनी नदीपात्रात अजिबात जाऊ नका, गुरे–ढोरे व मुले पाण्यात जाऊ देऊ नयेत, मासेमारी व वाहतूक थांबवा, पाण्याखालील पुलावर प्रवास करू नका, ‘नदीकाठच्या गावांनी निष्काळजीपणा करू नये, अन्यथा जीवितहानी होऊ शकते, असा इशारा या प्रशासकीय अधिकार्यांनी नागरिकांना दिला आहे.