– सोयाबीनला कोंब फुटले, मूग, उडीद सडला, हाती आला पाचोळा!
– पाच मंडळात अतिवृष्टी; शेतकरी पुरता उद्ध्वस्त!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या पावसाने तडाखा दिला आहे. कालपासून जोरदार पाऊस सुरू असून, पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीनला कोंब फुटले असून, मूग, उडीद सडला आहे, त्यामुळे शेतकर्यांना हाती पालापाचोळा गोळा करण्याची वेळ आली आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, सर्वत्र हाहाकार उडाल्याची स्थिती आहे. नद्या-नाल्यांना पूर असून, धरणे भरली गेली आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. मे महिन्यात अवकाळी अतिवृष्टी, जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस, पिके चांगली बहरली असताना ऑगस्ट महिन्यात पुन्हा अतिवृष्टी, सप्टेंबर महिन्यात रिपरिप पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद सडला, पाचोळा जमा करण्याची पाळी आली. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन सोंगणीला आले असताना पुन्हा पावसाच्या हजेरीने सोयाबीनला कोंब फुटले. आता तर शेतकरी पार कोलमडला आहे. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातील दि. २६ ते २९ असे तीन ते चार दिवस अतिवृष्टी सांगितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली, नदी नाल्यांना पूर आले. शेकडो गुरे ढोरे वाहून गेली, जमिनी खरडल्या आणि शेतकर्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. आभाळ फाटले, आसू आटले, सोयाबीनला कोंब फुटले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सिंदखेडराजा, किनगावराजा, सोनोशी, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा ही सात मंडळे येतात. यापैकी साखरखेर्डा मंडळात चार वेळा, दुसरबीड, किनगावराजा, सोनोशी, सिंदखेडराजा मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली. शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा या दोन मंडळात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे. पाऊस थांबायला तयार नाही. शेतकरी सोयाबीन सोंगणीला मजूर शोधत आहे. मजूर मिळाले पण पाऊस थांबला पाहिजे तरच सोयाबीन सोंगता येते. काल २७ सप्टेंबररोजी दिवसभर पावसाने चांगलीच हजेरी लावली. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सोयाबीन शेंगातून कोंब फुटले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशी वाढत आहे. काळी माती आणि बागायती कापसाची अवस्था बिकट झाली आहे. अती पाऊस आणि वार्यामुळे झाडे मुळासकट पडली आहेत. काही शेतातील कपाशी सडली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहपालक मंत्री सावकारे, पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला आहे. अनेक गावात घरांची पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पडझड झालेल्या घरांना मदत मिळाली नाही. याला स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा सर्वे केला नाहा. अहवाल पंचायत समिती कार्यालयात पाठविला नाही. त्यामुळे तहसीलदार अनुदान देऊ शकत नाही.
अशा निष्क्रिय ग्रामपंचायत अधिकार्यांवर कारवाई केली पाहिजे. पण राजकीय नेते अशा अधिकार्यांना पाठीशी घालीत आहेत. मंत्री, आमदार, खासदार यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असली तरी प्रत्येक गावाचा अहवाल आला की नाही याची पुष्टी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, सर्व विभागाचे अधिकारी यांची तालुक्याच्या ठिकाणी आमसभा घेऊन माहितीची खातरजमा करून घ्यावी. आजही काही ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी राजकारण करीत असल्याचे आढळून आले आहे. पंचनामे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करून नुकसान अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांची आहे. यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. साखरखेर्डा ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यविरुद्ध ग्रामपंचायत अधिकारी असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी यांनी ऑगस्ट महिन्यात पडझड झालेल्या घरांची माहिती पंचायत समिती कार्यालयात मंजुरीसाठी पाठविली नाही. पर्यायाने त्या २९ कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नाही. हा प्रकार इतर ग्रामपंचायतमध्ये घडू नये, हीच अपेक्षा.