– खामगाव येथे चाकूने भोसकून ऋतुजाचा खून, तर चाकू भोसकून घेऊन साहीलने केली होती आत्महत्या!
– दोन्हीही ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडले अंत्यसंस्कार!
– दोन्हीही ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडले अंत्यसंस्कार!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील सोनू उर्फ साहील राजपूत या तरूणाने शिंदी येथील ऋतुजा खरात या युवतीचा प्रेमप्रकरणातून व अंतर्गत वादातून खामगाव येथील जुगनू हॉटेलमध्ये चाकूने भोसकून खून केला होता. तर नंतर स्वतःलाची चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली होती. आज (दि.२४) दुपारी ४ वाजता साखरखेर्डा येथे साहीलवर तर ६ वाजता शिंदी येथे ऋतुजाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.
साखरखेर्डा येथील एका मुलीच्या नावाने बोगस आधारकार्ड तयार करून खामगाव येथील जुगनू हॉटेलमध्ये सोनू उर्फ साहील राजपूत हा ऋतुजा खरात या युवतीला भेटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऋतुजा खरात ही मुलगी शिंदी येथील रहिवासी असून, तिचे शिक्षण साखरखेर्डा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे. दहावीत चांगले गुण मिळाल्याने तिचा नंबर पॉलिटेव्नâीक कॉलेजला खामगाव येथे लागला होता. साखरखेर्डा येथे शिक्षण घेत असताना या दोघांची ओळख झाली. हळूहळू खामगाव येथे जाऊन साहील राजपूत हा तिला भेटत असे. सोनू उर्फ साहील राजपूत याचा शेती व्यवसायबरोबर जोड व्यवसाय म्हणून दूधविक्रीचा धंदा आहे. दि. २३ सप्टेंबररोजी दुपारी चार वाजता सोनू राजपूत हा मोटारसायकलने खामगाव येथे गेला. त्याठिकाणी ऋतुजा खरात हिची भेट झाली. दोघेही ठरल्याप्रमाणे हॉटेल ‘जुगनू’मध्ये आले. एका खोलीत बराचवेळ दोघांत भांडणं झाले. त्यात रागाच्या भरात ऋतुजा हिच्यावर चाकूने वार करुन साहीलने तिला ठार मारले, आणि स्वतः छातीत चाकू भोसकून घेत आत्महत्या केली. ही वार्ता साखरखेर्डा आणि शिंदी येथे पसरताच चर्चेला उधाण आले. अचानक ऐवढे टोकाचे पाऊल का उचलले? याची चर्चा सुरू झाली. साखरखेर्डा येथील राजपूत परिवार आणि शिंदी येथील खरात परिवार खामगाव येथे गेला. तेथे पोलिसांनी अगोदरच पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात दाखल केले होते. आज, दि.२४ सप्टेंबररोजी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर सोनू उर्फ साहील राजपूत याचा मृतदेह साखरखेर्डा येथे आणण्यात आला. चार वाजता भोगावती नदीवरील हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले, तर ऋतुजा खरात हिच्यावर शिंदी येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनू उर्फ साहील राजपूत याने टोकाचे पाऊल का उचलले? या दिशेने साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने खामगाव येथील पोलिस तपास करीत आहे. आज खामगाव आणि मेहकर येथील उपविभागीय पोलिस अधिकारीपदाचा पदभार प्रदीप पाटील यांच्याकडे असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांचे लक्ष आहे. या खून प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू असून, त्यांच्या खुनाचे कारण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर स्पष्ट होईल. साखरखेर्डा आणि शिंदी येथे शांतता असून, पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एपीआय मंदार पुरी हे करीत आहेत.
शिंदी येथील मुलीची खामगावातील जुगनू हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या; मुलानेही केली आत्महत्या!