– प्रेमप्रकरणातून हत्याकांड, दोन्हीही प्रेमीयुगुल साखरखेर्डाचे; खामगाव हादरले!
– हॉटेल जुगनू पुन्हा चर्चेत, पोलिसांकडून तपास सुरू!
खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे/अशाेक इंगळे) – साखरखेर्डाजवळील शिंदी येथील ऋतूजा पद्माकर खरात या युवतीची खामगाव येथील जुगनू हॉटेल येथे तिच्या प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. त्यानंतर साहील उर्फ सोनू राजपूत या युवकानेही स्वतःला चाकूने भोसकून घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. खामगाव शहरातील सजनपुरी येथील जुगनू हॉटेलमध्ये आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हे थरारक हत्याकांड घडले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला व सकाळी कडेकोट बंदाेबस्तात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेने खामगाव हादरले असून, जुगनू हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोन्हीही प्रेमीयुगुल साखरखेर्डा परिसरातील रहिवासी असून, मुलगी शिक्षणासाठी खामगावला होती. याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.


सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील सोनू उर्फ साहील दीपकसिंह राजपूत (वय २२) व ऋतूजा पद्माकर खरात, रा.शिंदी, ता. सिंदखेडराजा हे प्रेमीयुगुल खामगावजवळील सजनपुरी येथील हॉटेल जुगनूमध्ये थांबले होते. दरम्यान, काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती आहे. यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने भोसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सोनू राजपूत यानेदेखील त्याच चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली. या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती असून, या हॉटेलमध्ये ते वारंवार येत असल्याचेही कळते आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली व मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, सहाय्यक पोलिस अधीक्षक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील आदींसह पोलिस अधिकार्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या व मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रूग्णालयात रवाना केला होता. याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. याबाबत खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःला धारदार शस्त्राने भोसकून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी तपासात समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे.
या दुर्देवी घटनेतील ऋतुजा पद्माकर खरात, रा. शिंदी ही युवती खामगाव येथील पॉलिटेकनीक कॉलेजला शिकत असून, ती या मुलासोबत जुगनू हॉटेलमध्ये यापूर्वीही आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोघांतील कडाक्याच्या भांडणातून चाकूने भोसकून हे हत्याकांड घडले असावे, असा पोलिसांचा कयास असून, अधिक तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार अहेरकर हे करत आहेत. दरम्यान, बाहेरगावी शिकण्यासाठी मुली ठेवलेल्या पालकांनी आपली मुलगी नेमकी काय करते, याबाबत दक्ष राहण्याची गरज या दुर्देवी घटनेतून अधोरेखीत झाली आहे.
विशेष म्हणजे, या दोघा युगुलांनी रूम बूक करताना वेगळ्याच मुलीचे आधारकार्ड दिले होते. त्यावर पूजा पवार असे नाव होते. त्यामुळे सुरूवातीला पोलिसांचाही गोंधळ उडाला. नंतर जेव्हा खरी माहिती समोर आली तेव्हा मुलीचे नाव ऋतुजा खरात, रा. शिंदी, ता. सिंदखेडराजा असे खरे नाव समोर आले. शहरात तर सुरूवातीला ‘लव्ह जिहाद’ची अफवा पसरली. मुलाचे नाव ‘साहील’ असल्याने मुलगा मुस्लीम असावा, अशी शंका निर्माण झाल्याने मोठा तणाव हॉटेलबाहेर निर्माण झाला होता. परंतु, मुलगा सोनू राजपूत असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर तणाव निवळला होता.