– सुदुंबरे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी तिरंगा रॅलीने वेधली ग्रामस्थांची मने!
चिखली/पुणे (एकनाथ माळेकर) – राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुदुंबरे (ता. मावळ) येथे जोरदार तिंरगा रॅली काढून, देशवासीयांची मने जिंकली. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफचे जवान आपल्या प्राणाची बाजू लावून नागरिकांचे जीव वाचवित असतात. ‘आपदा सेवा सदैव सर्वत्र’ हे त्यांचे बोधवाक्य अक्षरशः आपल्या सेवेने खरे ठरवले आहे. देशभरातील १६ बटालियनद्वारे सुमारे १८,३८४ जवान व अधिकारी आपली सर्वोच्च सेवा देशासाठी देत आहेत.
एनडीआरएफच्या पाचव्या वाहिनीद्वारे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथे देशाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वाहिनीने हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत भव्य रॅली काढून ग्रामस्थांची मने जिंकली. एनडीआरएफच्या जवानांचा या रॅलीत उत्स्फुर्त सहभाग होता. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजे ‘एनडीआरएफ’. ही यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्यावेळी एनडीआरएफ हे परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी सर्वात प्रथम या दलाला पाचारण करण्यात येते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत हे दल स्थापन करण्यात आलेले आहे. ‘आपदा सेवा सदैव सर्वत्र’ हे या दलाचे घोषवाक्य आहे. यानुसार आपत्ती सेवेसाठी सदैव तत्पर असणारी ही यंत्रणा आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ही यंत्रणा कार्य करते. स्थापनेच्यावेळी या यंत्रणेचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती १६ करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे १,१४९ अधिकारी आणि जवान कार्यरत असतात. आणि, प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत ४५ जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरित्या प्रशिक्षित जवान असतात.
महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण १८ तुकड्या आहेत – तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात १४ तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते. भारतातील केंद्रीय पोलिस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून एनडीआरएफमध्ये निवडण्यात येते. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षे इतका असू शकतो. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आणि एसएसबी यासारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते. नियुक्ती केलेल्या जवानांना १९ आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षण दिले जाते. जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणे वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावे. प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसेच प्राण्याच्या मृतदेहांचे व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते.
‘जनजागृती कार्यक्रम’
केवळ दुर्घटना किंवा आपत्ती यातून लोकांना वाचवणे इतकेच नाही तर एखाद्या आपत्तीप्रसंगी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती देण्याचे काम देखील एनडीआरएफ करत आहे. यासाठी त्यांना राज्य तसेच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांसोबत समन्वय राखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड, एनसीसी आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण दिले जाते. यासाठी शाळा-महाविद्यालयात शिबीरे घेण्यात येतात. आपत्तीच्यावेळी एनडीआरएफला जाण्यास उशीर झाल्यास नागरिकांना स्वतः त्यातून मार्ग काढता यावा, यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेतली जाते. अनेक वेळेला किनारपट्टीच्या भागात जेव्हा एखादे चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला जातो, तेव्हा या तुकड्या गावोगावी जाऊन वस्तीतील सतर्क करतात, परिसर रिकामा करण्यात मदत करतात आणि ओढवू शकणारी हानी आधीच टाळतात. म्हणूनच संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचविणारे जणु हे ‘देवदूत’च आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.