भूमी अभिलेख विभागाची महत्वाची भूमिका; गुडघाभर पाण्यातूनही कर्मचाऱ्यांची विक्रमी कामगिरी!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – शेत रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याशी निगडित आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याने महसुली पंधरवाड्याच्या पहिल्या टप्प्यात शिव पाणंद रस्ते सीमांकन कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महसुली पंधरवाडा साजरा होत असून, त्यातील पहिला टप्पा “पाणंद रस्ते सीमांकन” म्हणून साजरा होत आहे.
या अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील सात महसूली मंडळातील प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या पथकांनी गावनिहाय नियोजन केले आहे. 20 सप्टेंबर रोजी मौजे उगला येथे भुमापक प्रकाश शिंदे, श्रीकांत बुलबुले व सय्यद शोएब यांनी आधुनिक रोवर यंत्राद्वारे सीमांकनाची कामगिरी पार पाडली. या प्रक्रियेत रस्त्यांचे सर्व पॉईंट्स सॅटेलाईटच्या माध्यमातून कायमस्वरूपी जतन केले जात आहेत. उगला गावातील ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 12 शिव पाणंद रस्त्यांची निवड करून सीमांकन झाले. अतिवृष्टीमुळे गुडघाभर पाणी, चिखल व झाडी-झुडपांतूनही कर्मचारी व गावकरी यशस्वीरीत्या कार्यरत राहिले. या प्रामाणिक व विक्रमी कामगिरीबद्दल उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ग्रामपंचायत व गावकऱ्यांचा मोठा सहभागही लक्षणीय ठरला. सरपंच अभिमान उगले, मंडळ अधिकारी टेकाळे साहेब, महसूल सहाय्यक राजेश जाधव, तसेच पुरुषोत्तम उगले, हरिभाऊ उगले, सतीश उगले, गजानन उगले, सोपान उगले, रामभाऊ उगले यांसारख्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यामुळे सीमांकन मोहिमेला एक वेगळेच बळ लाभले. पुढील टप्प्यात राहेरी बुद्रुक, पिंपळगाव लेंढी, पळसखेड चक्का, मोहाडी, शेंदुर्जन, निमखेड आणि मलकापूर पांग्रा या गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.