– सावखेड तेजन, पळसखेड चक्का व किनगावराजा येथे केली शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील किनगावराजा मंडळात दि. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. सदर नुकसानीची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज, दि. २० सप्टेंबररोजी सावखेड तेजन, पळसखेड चक्का व किनगावराजा येथे केली. यावेळी अतिवृष्टी मदतीतून एकही शेतकरी सुटणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेतकर्यांना दिली.
या पाहणीवेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी भास्करराव घुगे, तालुका कृषी अधिकारी, सावखेड तेजनचे ग्राम महसूल अधिकारी विष्णू थोरात, श्रीमंत पांडव, ग्रामसेवक ठाकरे सिंदखेडराजाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप, गोपनीय विभागाचे अंमलदार श्रावण डोगरे, महसूल सेवक राजू खरात आदी उपस्थित होते. यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की, ‘अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा एकाही शेतकर्याला मदतीतून वंचित ठेवले जाणार नाही. स्थानिक महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी शेतकर्यांच्या नुकसानीची सविस्तर पाहणी करून संयुक्त पंचनामा तयार करावा व शासनाला सादर करावा.’ त्यांनी पुढे सांगितले की, नदीपात्रातील पाणी अनेक शेतकर्यांच्या शेतात घुसून पिके व जमीन वाहून गेली आहे. ढगफुटीमुळे अनेक घरांचे तसेच विहिरींचे नुकसान झाले असून बैल, गायी, शेळ्या, मेंढ्या यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत. सर्व नुकसानग्रस्तांची माहिती तहसील कार्यालयात सादर करून भरपाईसाठी पाठवावी, तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती गावपातळीवर चावडी वाचनाद्वारे जाहीर करावी, म्हणजे कोणताही शेतकरी यातून सुटणार नाहीत, असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले. या वेळी बाबुराव मोरे, तालुकाध्यक्ष वैभव देशमुख, बबन शेळके, डिगांबर हुसे, विलास विघ्ने, उमेश हुसे, गणेश हुसे, रमेश हुसेसह मोठ्या संख्येने शिवसेना नेते, गावाचे सरपंच व शेतकरी उपस्थित होते.
दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाटची गावे बाधित होतात. या पूरग्रस्तभागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्यावतीने ‘सेवक रथ’ मोबाइल वैद्यकीय सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांवर उपचार सेवा देणार आहेत. त्यामुळे अपातग्रस्त भागात तात्काळ वैद्यकीय उपचार रोग प्रतिबंधक उपचार नागरिकांना या सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.