– माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना घडला अपघात; गंभीर जखमी झालेला युवक कोमात!
चिखली (राजेश लोखंडे) – अमरावती विभागाचे वाशिमचे शिक्षक आमदार किरण सरनाईक हे आज (दि.१८) सकाळी वाशिमवरून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी बुलढाण्याकडे जात असताना, चिखलीतील डॉ. पानगोळे हॉस्पिटल समोर रस्त्याने पायी जाणार्या कृष्णा नंदू लष्कर (वय २५ वर्ष, रा. गौरक्षण वाडी, चिखली) यास त्यांच्या इनोव्हा कारची जबर धडक बसली. इनोव्हा गाडी भरधाव जात असताना हा युवक अचानक गाडीसमोर आल्याने हा दुर्देवी अपघात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात कृष्णा लष्कर हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर आमदार किरण सरनाईक यांनी स्वतः जखमी कृष्णाला त्यांच्या इनोव्हा (क्र. एमएच ३७, व्ही ५५) कारने डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांना उपचाराच्या सूचना देऊन आ. सरनाईक हे पुढे बुलढाण्याकडे रवाना झाले. सध्या गंभीर जखमी युवकावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तो सध्या कोमात असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.
वाशिम येथील रहिवासी आणि सध्या शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेले किरण सरनाईक हे आज (दि.१८) सकाळी बुलढाणा शहरात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी येत होते. या अनुषंगाने ते चिखली शहरातून जात असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सरनाईक यांच्या भरधाव इनोव्हा वाहनासमोर अचानक रस्ता ओलांडताना कृष्णा नंदू लष्कर, रा. गौरक्षण वाडी, चिखली हा तरुण आला. पानगोळे हॉस्पिटलसमोर गाडीने त्याला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. या जखमी युवकाला आ. सरनाईक यांनी आपल्या गाडीतून नजीकच्या डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले व डॉक्टरांना उपचाराच्या सूचना केल्या. त्यामुळे या जखमी युवकावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू झाले होते. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. चिखली पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त गाडी व गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले असून, चालकाची चौकशी सुरू होती. अपघातग्रस्त तरूण कोमात गेल्याचे वृत्त असून, त्याला छत्रपती संभाजीनगरला हलविण्याची शक्यता वर्तविली जात होती.
नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी आमदार व अधिकाऱ्यांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अपघात ग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी चिखलीकरांनी केली आहे. या अपघातप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली. या घटनेमुळे चिखली शहरात संताप व्यक्त केला जात होता. अपघातास कारणीभूत वाहन (इनोव्हा कार) चिखली पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून, चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.