– मंगरूळ येथील शेतकरी राजेंद्र बोर्डे यांच्यावर कोसळले सुलतानी व अस्मानी संकट!
– पाच दिवसांत कंपनीला नुकसान भरपाई द्यायला लावा; अन्यथा तालुका कृषी कार्यालयात आमरण उपोषणाचा इशारा!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – मंगरूळ येथील शेतकरी राजेंद्र सुदाम बोर्डे यांनी पेरलेले मका पिकाचे बियाणे वांझोटे निघाले असून, त्यामुळे त्यांचे सुमारे ९० टक्के नुकसान झाले आहे. संबंधित बायर कंपनीने बोर्डे यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली असताना, नुकसानीचा अहवाल दिला. परंतु, कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या व हतबल झालेल्या बोर्डे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्काही बसला. परंतु, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. कंपनीला तातडीने नुकसान भरपाई द्यायला लावा, अन्यथा तालुका कृषी कार्यालयात आमरण उपोषणास बसू, असा इशारा शेतकरी बोर्डे यांनी दिला आहे.
सविस्तर असे, की मंगरूळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र सुदाम बोर्डे यांची गट नंबर ३७१ व भाऊ गणेश सुदाम बोर्डे यांची गट नंबर ३७० तसेच रूख्मिनी विठ्ठल बोर्डे गट नंबर ३७० अशी तिघांची मिळून कसण्यासाठी साडेनऊ एकर जमीन सध्या त्यांच्याकडे आहे. सदर क्षेत्रात यावर्षी संपूर्ण मका पीक लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि त्यानुसार बायर कंपनीचे पिनीकॉल ही व्हेरायटी दुकानदार बालाजी कृषी केंद्र चिखली यांच्या व त्यांच्या दुकानात बसलेले कंपनीचे काही प्रतिनिधी यांच्या आग्रहावरून बियाणे विकत घेतले व संपूर्ण मका याच व्हेरायटीची लावली. सदर मका पिकाचा फळधारणेच्या कालावधी पूर्ण होऊन वाढ ही पूर्ण झाली. परंतु सदर पिकाला अजूनही कणसे आलेले नाहीत. तेंव्हा कृषी अधिकारी यांनी शेतावर येऊन पाहणी केला असता, जवळपास त्यांच्या पाहणीनुसार, ६१ टक्के धांड्यांना कणसेच नाहीत, व इतर काहींना कणसे आहेत. परंतु त्यामध्ये दाणेच भरलेले नाहीत. अर्थात ते छोटे छोटे कुपोषित झाल्यासारखे आहेत. या नुसार जवळपास ९० टक्के नुकसान झाले असून, ८० टक्के नुकसान असल्याचा अहवालसुद्धा कृषी अधिकारी यांनी दिलेला आहे. कंपनीचे बियाणे सदोष आहे, असे अनेक जाणकारांनी सांगितले व अधिकार्यांनीही तसा अहवाल दिला. मात्र सदर कंपनीच्या लोकांना वारंवार विनंती करूनही ते नुकसान भरपाई द्यायला तयार नाहीत. सदर पीक लागवड व त्याचे पालन पोषण करत असताना खूप मोठा खर्च झाला. शिवाय, भावाची व काकाची जमीनही त्यांच्याकडे ठोक्याने आहे. अशी बिकट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी व्याजाने पैसे काढून संपूर्ण खर्च केला, आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर मात्र ते पूर्णपणे खचून गेले असून, हतबल झाले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांनी ज्या दिवशी सांगितले की, तुम्ही कोर्टात जावा. आम्ही तुम्हाला मदत देऊ शकत नाही. त्याच दिवशी राजेंद्र बोर्डे यांना एसटी बसस्थानकावर संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तरीसुद्धा कंपनीच्या लोकांनी त्यांची साधी भेट घेण्याचासुद्धा विचार केला नाही. किंबहुना कृषी कार्यालयाच्या अधिकार्यांनी तरी माणुसकी दाखवत त्यांना आधार देण्याचा किमान प्रयत्न करायला हवा होता. परंतु तोसुद्धा केल्या गेला नाही. या शेतकर्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, ते आता सध्या तरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या शेतकर्यावर झालेले कर्ज कसे फेडणार? त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवणार? मुलांचे शिक्षण कसं चालू ठेवणार? आदी गंभीर समस्या या शेतकर्यापुढे निर्माण झाल्या आहेत. शेतीशिवाय त्यांच्याकडे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. याबाबत बोर्डे यांनी प्रशासनाला निवेदनही सादर केले असून, सदर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. शिवाय, त्यांच्या प्रमाणेच इतर शेतकर्यांची फसवणूक होणार नाही व झालेली फसवणूक ही खूप मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.
मका पिकाचे बियाणे बोगस निघाले असून, कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा येणार्या पाच दिवसानंतर आपल्या कार्यालयातच आत्मक्लेष व आपल्याच दालनात बेमुदत आमरण उपोषण कोणत्याहीक्षणी सुरू करेल, अशा स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा संबंधित शेतकरी राजेंद्र सुदाम बोर्डे यांनी तालुका कृषी अधिकार्यांना दिला आहे.