राजेंद्र काळे
बुलडाणा : २००४ नंतरचा तो काळ, प्रथमच मराठा आरक्षणाचा प्रश्न सामाजिक पातळीवर ऐरणीवर आणला तो विनायकाव मेटे यांनी. तेव्हा ते राष्ट्रवादीत हाते, अन् सरकारही काँग्रेस-राष्ट्रवादीचेच.आपल्याला सरकारला समाजासाठी लक्ष्य करुन त्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला एल्गार पुकारला तो, संतनगरी शेगावमधून. मार्केट यार्डच्या प्रांगणावर ‘शिवसंग्राम’ संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी लढा पुकारतांनाच त्यांनी, छत्रपती शिवरायांचे भव्य-दिव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्याची संकल्पना मांडली होती. बुलडाणा जिल्ह्याशी त्यांचे कायम भावनिक ऋणानूबंध राहिले. मराठा महासंघाच्या माध्यमातूनही त्यांचे काम बुलडाणा जिल्ह्यात होते. अण्णासाहेब पाटील येरळीकर यांना त्यांनी मार्गदर्शकच मानले होते. अ.भा. मराठा महासंघाच्या कार्यकारिणीत ते सचिव असतांना, बुलडाण्याचे तुकाराम अंभोरे पाटील अध्यक्ष होते. गर्दे हॉलमध्येही मराठा आरक्षणासाठी त्यांचा भव्य मेळावा पार पडला होता.
आ.विनायकराव मेटे हे सामाजिक माध्यमातून बुलडाणा जिल्ह्याशी संपर्कात असायचे. ‘शिवसंग्राम’ माध्यमातून त्यांनी तरुणांचे जाळे तयार केले होते. अजय बिल्लारी, संदिप गायकवाड, जगदिशचंद्र पाटील या विविध तरुणांच्या सहाय्याने त्यांनी केलेले काम दिशादर्शक होते. जितेंद्र एन. जैन यांच्या पुढाकारातून २०१५ला जवळपास ५०० विधवा महिलांना मेटे यांच्या हस्ते साडी-चोळीचे वाटप करण्यात आले होते. ऑगस्ट २०१७ला शेगावला पार पडलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४१व्या राष्ट्रीय अधिवेशनात उद्घाटन सोहळ्यात आ.विनायकराव मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या काळातही वर्तमानपत्राचे महत्व आपल्या वैचारिक भाषणातून अधोरेखित केले होते. त्यानंतर त्यांनी एस. एम.देशमुख यांना ‘मराठवाडा गौरव’ पुरस्कार दिला. राज्यभर होणाऱ्या त्यांच्या विविध कार्यक्रमांना बुलडाणा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असायची.
घरातला व्यक्ती गेल्याचे दुःख – अंभोरे पाटील
गेल्या ३५ वर्षांपासून विनायकराव मेटे यांच्याशी सामाजिकच नव्हेतर कौटुंबिक ऋणानूबंध राहिले. नव महाराष्ट्र पार्टी राष्ट्रवादीत विलीन केली तेव्हाही सोबत होतो. मेटे परिवार व अंभोरे परिवार, हे एकमेकांशी मराठा महासंघ ते शिवसंग्रामपर्यंत जुळलेले नाते होते. ते अचानक गेल्याची बातमी ऐकून फार मोठा धक्का बसला. आज आमच्या घरीच काय मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांच्या घरी चुल पेटली नाही, अशा शोकसंवेदना व्यक्त करतांना तुकाराम अंभोरे पाटील यांना गहिवरुन आले व त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
▪️ विनायकराव मेटे बनले होते पहिल्यांदा आमदार, अंभोरे पाटलांच्या पत्रानेच..
युतीचे सरकार होते, मनोहर जोशी मुख्यमंत्री व गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री. त्यावेळी या सरकारला मराठा महासंघाने पाठिंबा जाहीर केला होता. म्हणून महासंघाचा एक नेता विधानपरिषदेचा आमदार करण्याचे ठरले. शशिकांत पवार नंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम अंभोरे पाटील यांनी त्यावेळी पदभार घेतला होता, तर विनायकराव मेटे सचिव होते. मराठा महासंघाने एमएलसीत मेटे यांचे नाव पुढे केले, ते पत्र अंभोरे पाटलांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री जोशी यांच्याकडे पाठविण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय !
(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी, विदर्भातील वरिष्ठ पत्रकार आणि ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे नाशिक व विदर्भ विभागाचे सल्लागार संपादक आहेत. संपर्क 9822593923)