– अॅड. कु. माधुरीताई पवार यांच्यासोबत अनाथ मुलांनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव!
हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के) – येथील नित्यानंद अनाथ आश्रमात राहणार्या ६० अनाथ व वंचित मुलांसाठी देवानंद पवार फाउंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्बन परिवाराच्यावतीने रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या मुहुर्तावर ६० हजाराचे साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये चांगल्या दर्जाचे बूट, वह्यांचा संच, पेन, मिठाई, शालेय साहित्य आदी साहित्याचा समावेश होता.
या कार्यक्रमाला सप्तशृंगी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पवार, सप्तशृंगी महिला अर्बन व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. कु. माधुरी पवार, उपाध्यक्ष विष्णू वाकळे, व्यवस्थापक सुभाष खरात, राजेंद्र गायकवाड, बालू ससाणे, तुकाराम चव्हाण, विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त पुरुषोत्तम आकोटकर, पत्रकार समाधान म्हस्के, शिवप्रसाद थुट्टे तसेच सप्तशृंगी बँकेचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अॅड. कु. माधुरी पवार म्हणाल्या, ‘या मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा योग आला. मला तालुक्यात एक लाख दहा हजार राख्या पाठवता आल्या. मी इतक्या भावांची बहीण आहे. समाजात कार्य करताना आपणही एक महत्त्वाचा घटक आहात.’ तसेच त्यांनी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे अनेक हृदयस्पर्शी किस्से सांगून उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन नित्यानंद अनाथ आश्रमाचे संस्थापक अनंत शेळके यांनी केले.