– पांढरदेव शिवारात उभे पीक पाण्याखाली; भोरसा भोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव भागात पावसाने हाहाकार!
– तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत
– डॉ. विकास मिसाळ, सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून केली तातडीने मदतीची मागणी
चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यात आज (दि.९) ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. पावसाच्या या प्रकोपामुळे भोरसा भोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला. पावसामुळे घरात पाणी शिरले, शेतमाल वाहून गेला, तर काही ठिकाणी जनावरांचेही नुकसान झाले. शेतीपिकांचीही अतोनात हानी झाली असून, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, व पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून पावसाने हाहाकार उडालेल्या भागात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
चिखली तालुक्यातील या पावसाने शेतकर्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडाल्याने ‘ओला दुष्काळ’ परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, तसेच घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले. गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विजेच्या तारा यांनाही फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल जाधव व शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील यांनी तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. ‘सरकारने तत्काळ पावले उचलून बळीराजाला मानसिक आणि आर्थिक बळ द्यावे, अन्यथा संतापाची लाट उसळेल,’ असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक प्रशासनाने पावसामुळे बाधित भागांची पाहणी सुरू केली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्याच्या तयारीत आहे. तथापि, नागरिक आणि शेतकरीवर्गाला मदत मिळण्यास विलंब झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकर्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात गेले आहे. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, तसेच घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले. गावातील शाळेमध्ये पाणी तुंबल्याने तलावाचे स्वरुप शाळेला व गावाला आल्याचे बघावयास मिळाले. एकलारा, शेलगाव ज., तेल्हारा या शिवारात सकाळपासून पाऊस कोसळत होता. यापूर्वीच जमिनीची पोत भरली असल्याने आता मुसळधार पाऊस झाल्याने काही भागात शेतकर्यांचे पीक पाण्याखाली गेल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.
- पांढरदेव शिवारातील शेतकर्यांचे उभे पीक पाण्याखाली!
- शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून काही भागात दुबार पेरणी करून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूंग या पिकांची लागवड केली आहे. पांढरदेव येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली, तसेच घरांचे, रस्त्यांचे आणि जनावरांचीही प्रचंड हानी झाली आहे. प्रशासनाने पाहणी करून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य व त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी यांनी शेतकर्यांसह प्रशासनाकडे केली आहे.
- चिखली तालुक्यात पांढरदेव येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याचप्रमाणे भोरसा-भोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, एकलारा, तेल्हारा, शेलगाव ज. अशा अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पांढरदेव गावात व परिसरात ढगफुटल्यासारखा पाऊस कोसळला. या पावसामुळे घरात पाणी शिरले, शेतीपिकालासुद्धा पावसाचा फटका बसल्याने याबाबतची माहिती पांढरदेव येथील शेतकर्यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांना दिली. त्यांनी शेतकर्यांना धीर देत कृषी व महसूल विभागाशी संपर्क साधून प्रशासनाला या गंभीर परिस्थितीबाबत अवगत केले, व तातडीने पाहणी करावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली. त्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी यांनी पांढरदेव येथे पाहणीदेखील केली. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच चेतन म्हस्के, भागवत म्हस्के, रवी म्हस्के यांच्यासह आदिंनी केली आहे.
- भोरसा भोरसी येथील शेतकरी महिला संगीता संतोष आकाळ यांच्या सावंगी गवळी येथील भाग 2, गट नं 68/04 मधील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. हिच परीस्थिती अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, ग्रामस्थ व शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या तालुक्यात शेतकर्यांवर वारंवार नैसर्गिक संकटे येत आहेत. त्यातच शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून गेला असून, आजच्या पावसाने त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. तेव्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व आधार द्यावा, अशी म्ाागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ व चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.