– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘मूकनायक फाउंडेशन’द्वारे होणारा सन्मान
बुलढाणा (महेंद्र हिवाळे) – विविध देशातील नावलौकिक असलेल्या भिख्खू संघाच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे मूकनायक फाउंडेशनद्वारे दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धम्म परिषदेला भारत, चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, मलेशियासह इतर बौद्ध देशातील भिख्खूदेखील उपस्थित राहणार आहेत.
या धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा मूकनायक फाउंडेशनच्यावतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा मूकनायक पुरस्कार देऊन गौरवदेखील करण्यात येणार आहे. त्यासाठी कला, वैद्यकीय, संरक्षण, विधी, शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, समाजकार्य, साहित्य व प्रशासन इत्यादी क्षेत्रातील दखलपात्र कामगिरी करणार्या मान्यवरांनी आपल्या कार्याचा अहवाल पाठविण्याचे आवाहनही मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. पुरस्कारासाठी अहवाल पाठविण्याची मुदत पुढील १५ सप्टेंबरपर्यंत असून, दोन प्रतीमध्ये पाठवणे बंधनकारक असणार आहे. या सोबतच समाजातील उद्योजकांना चालना देण्यासाठी व नवउद्योजक होऊ इच्छिणार्या तरुणांसाठी बिझनेस एक्सपोचेदेखील आयोजन करण्यात आलेले आहे. या एक्सपोमध्येदेखील उद्योजक, महिला बचत गट व इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मूकनायक फाउंडेशनद्वारे आयोजित जागतिक धम्म परिषदेला विविध स्तरातून बौद्ध धम्म बांधवांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला होता. बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांची उपस्थितीदेखील दखलपात्र होती. चक्रवर्ती सम्राट महान राजा अशोक यांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेल्या ऐतिहासिक अशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागतिक धम्म परिषदेचे आयोजन हे बौद्ध धर्म अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.