– बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा; वनविभागातही वनगुन्हा दाखल
– कारवाई कायद्याच्या चौकटीतच; उपवनसंरक्षक सरोज गवस यांची माहिती
बुलढाणा/मोताळा (सुरेश हुसे) मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वनविभागांतर्गतही स्वतंत्रपणे वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कार्यवाही नियमबद्ध व कायदेशीर मार्गानेच करण्यात आली, असे उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दि. २३ जुलै २०२५ रोजी, मोताळा वनपरिक्षेत्रातील मौजे मोहेगाव (राजूर वनपरिमंडळ, खैरखेड बिट, वनखंड क्र. ३२३) येथील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेदरम्यान वनविभाग, पोलीस व महसूल अधिकार्यांवर सुमारे १०० ते १५० लोकांच्या जमावाने अचानक हल्ला केला. दगडफेक, डोळ्यात मिरची पूड टाकणे, तसेच कुर्हाडी, कोयते व काठ्यांनी कर्मचार्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वनविभागाचे ५ कर्मचारी (२ महिला व ३ पुरुष), पोलीस विभागाचे ८ कर्मचारी (६ महिला व २ पुरुष) तसेच राज्य राखीव पोलीस दलातील १ जवान गंभीर जखमी झाले. कर्मचार्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी अतिक्रमण हटविण्यासाठी आणलेली जेसीबी फोडून नुकसान केले, तसेच सहाय्यक वनसंरक्षक मेहकर यांचे बोलेरो वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. इतर वाहनांवरही दगडफेक झाली असून काचांचे नुकसान व गंभीर हानी झाली आहे. या अतिक्रमणधारकांनी पूर्वी शेतीसाठी वनहक्क दावे दाखल केले होते. मात्र, घरासाठी कोणताही दावा दाखल करण्यात आलेला नव्हता. जिल्हा वनहक्क समितीने सन २०२२ मध्ये हे दावे नामंजूर केले होते. त्यानंतर झालेल्या पुनर्विलोकनातही २०२४ मध्ये दावे पुन्हा नामंजूर झाले. यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५३ व ५४ अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अतिक्रमणधारकांना पुराव्यासह हजर राहण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. सुनावणीनंतर अतिक्रमण निष्कसनाचे आदेश सहाय्यक वनसंरक्षक यांनी जारी केले. कार्यवाहीपूर्वी १५ दिवस अगोदर वैयक्तिक नोटीसा देण्यात आल्या. तसेच ३० एप्रिल २०२५ रोजी स्थानिक वृत्तपत्रांद्वारे जनतेला सूचित करण्यात आले. ९ मे ते १९ मे २०२५ दरम्यान एकूण ४००.०८७ हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. माळेगावसह इतर गावांमधील झोपड्या हटवून जलमृदासंवर्धनाचे काम व वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. तथापि, ३० जून २०२५ रोजी अतिक्रमणधारकांनी ट्रॅक्टर व टेम्पोंद्वारे पुन्हा वनक्षेत्रात घुसखोरी केली. त्यांनी नवीन झोपड्या बांधत जलमृदा संरक्षक कामे नष्ट केली व वृक्षतोड केली. यानंतर ११ जुलै २०२५ रोजी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला. याच पार्श्वभूमीवर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा, तसेच वनविभागात स्वतंत्र वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कार्यवाही प्राथमिक नोटीसा, पुनर्विलोकन, सुनावणी आणि कायदेशीर आदेशाच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय न करता, नियमानुसार ही कारवाई झाली आहे, असे उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी स्पष्ट केले.