– आमदार व संबंधित विभागाच्या अधिकार्यांची लाभणार उपस्थिती
चिखली (रंजना मोरे) – महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत निर्देशीत केलेले आहे. या निर्देशानुसार, चिखली तालुक्यात ११ मंडळस्तरावर ४ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे की, १ ऑगष्ट २०२५ रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ ‘महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्याहस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तर २ ऑगष्ट २०२५ रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियामानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात आले. ३ ऑगष्ट २०२५ पांणद रस्ते, शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगष्ट २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येणार असून, त्यामध्ये शेलुद, साकेगांव, वैरागड, आंचरवाडी, एकलारा, इसोली, थोडप, पेठ, केळवद, मेरा खु., कोलारा अशा एकूण ११ मंडळात आयोजन केले आहे. ५ ऑगष्ट २०२५ रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येईल. ६ ऑगष्ट २०२५ रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन थोरणानुसार नियामानुकुल करणे बाबत निर्णय घेण्यात येईल, आणि ७ ऑगष्ट २०२५ रोजी ‘M-Sand’ धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील जनतेने ‘महसूल सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपली प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडून करण्यांत येत आहे.