महसूल सप्ताह 2025 अंतर्गत शेतरस्त्यालगत लावण्यात आले वृक्ष; तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला उपक्रम!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महसूल विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र महसूल सप्ताह 2025 अंतर्गत दुसरबीड मंडळातील मौजे ताडशिवणी येथे आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. हा उपक्रम सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पानद शेत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. तसेच गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पण वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे पर्यावरण रक्षण, मातीचा अपरदन रोखणे आणि हरित ग्राम संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमास ग्राम महसूल अधिकारी वसुदेव जायभाये, गोरख पवार, शिवानंद नागरे, तसेच पोलीस पाटील, सरपंच व शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बोलताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिकता नसून भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. या झाडांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.” गावकऱ्यांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आगामी काळात अशा उपक्रमांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.