– पुलाचे बांधकामच बोगस; ठेकेदार व बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले!
– डांबरीकरण केव्हाही करा, किमान खड्डे तरी बुजवा; नागरिकांची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील भोगावती नदीवरील पुलाचे काम झाले. परंतु, संरक्षण कठडे, अप्रोजेस रस्ता करण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार केली असता निगरगट्ट अधिकार्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. किमान लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन काम पूर्ण करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी सवडद, मोहाडी येथील नागरिकांनी केली आहे.

साखरखेर्डा येथील भोगावती, सवडद येथील कोराडी नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष म्हणजे, भाजपा कार्यकर्त्याला काम मिळाल्याने कामाचा दर्जा चांगला असेल, असे नागरिकांना वाटले. परंतु, पुलाचे काम झाल्यानंतर चक्क लोखंडी रॉड उघडे पडले. वृत्तपत्रात बातमी येताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आपले पाप झाकण्यासाठी पुन्हा पुलावर भराव टाकला. दोन वर्ष झाली आजही कठड्याचे काम करण्यात आले नाही. भोगावती नदीवरील १०० मीटर अप्रोजेस रस्ता पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, संबंधित ठेकेदार यांनी काम केले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाबाबत माहिती मागितली असता अधिकारी देत नाही. आतातर या कामाबद्दल फोनही घेत नाही. आज साखरखेर्डा येथील भोगावती नदी जवळील रस्ता हा रस्ता राहिला नसून, छोटी छोटी डबकी तयार झाली आहे. अख्खी मारूती कार त्या डबक्यात जाऊन बसते. मोटारसायकल चालकांना तर कसरतच करावी लागते. कित्येक मोटारसायकल चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचे अपघात झाले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण होईल तेव्हा होईल, किमान ही खड्डी बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, जिजामाता विद्यालयाचे संचालक बबनराव रिंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख, खरेदी-विक्री संघाचे संचालक विलास आबा रिंढे, शिवदास रिंढे, सवडदचे माजी सरपंच शिवाजी लहाने यांनी केली आहे.