– भगदाड पडलेला बोगदा दाबण्याचे सोडून सांडव्यातून पाणी काढले, ग्रामस्थ संतप्त!
– आ. सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी; ग्रामस्थांना दिला दिलासा; प्रशासनाला कारवाईचे आदेश!
लोणार (वाजिद खान) – तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने शेतीपिकांचे आणि इतर शेतीपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२४) आमदार सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांसमवेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला. तसेच, तेथील लघु पाटबंधारे प्रकल्पाला भगदाड पडल्याने त्याचीही पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा दिला. दरम्यान, हे धरण फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरशः जागून काढली. प्रशासनानेदेखील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले होते. रात्रभर काम करून पाटबंधारे खात्याने सांडव्यातून पाणी काढले, पण बोगदा दाबला नाही, त्याबद्दल ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते.
आ. सिद्धार्थ खरात यांनी शेतीपिकांच्या नुकसानीच्या पाहणीसोबतच देऊळगाव कुंडपाळ लघु प्रकल्पाला भगदाड पडल्याने या सिंचन प्रकल्पाच्याबाबत वस्तूस्थिती जाणून घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत निर्देश दिले व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सांगितले. त्यांच्या समवेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, माजी सरपंच भागवतराव नरवाडे, रामभाऊ जायभाये, सतीश नरवाडे, विजय सरकटे, किशोर नरवाडे, विष्णू जायभाये, नितिन सरकटे, सुभाष गाढवे केशव सरकटे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. तसेच, माजी आमदार संजय रामुलकर यांनीदेखील कार्यकर्त्यासमवेत नुकसानग्रस्त भागाचा rपाहणी केली. शिंदे गटाचे तालुका प्रमुख भगवान सुलताने, जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, संदीप सरकटे, सुनील नरवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सोबत होते. दरम्यान, दि.२२ जुलैरोजी रात्री प्रशासनाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, परिवहन सेवेचे अधिकारी, अग्निशमन सेवेचे कर्मचारी तैनात होते. तहसीलदार लोणार यांनी ग्रामस्थांना परिस्थिती समजावून सांगितली. गावकर्यांना सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यासाठी नागरिकानी आपल्या इच्छित सुरक्षास्थळी जाऊन रात्र काढली. तसेच परिवहन विभागाचे बसेससुद्धा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी होत्या. नागरिकांना लोणार, माऊली मंदिरामध्ये, साखरखेडी देवी संस्थामध्ये आणि माऊली मंदिर परिसरात तसेच आपआपल्या नातेवाईकांकडे, व्यायाम शाळेवर गावकरी रात्री मुक्कामी होते. रात्रभर गावात शुकशुकाट पहायला मिळाला, ग्रामस्थ आपले घर सोडून इच्छित संरक्षितस्थळी दाखल झाले. परंतु रस्त्यावर, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून कार्यकर्ते होते.
धरण फोडा, नाहीतर बोगदा बुजवा;
ग्रामस्थांची प्रशासनाकडे आर्त हाक!
धरण भिंतीच्या मधोमध ज्या ठिकाणी भिंतीला भगदाड पडले ते भगदाड दाबायचे सोडून प्रशासनाकडून धरणातील पाणी सांडव्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी नाली खोदण्याचे काम पोकलँड व जेसीबीने हाती घेतले. आज सकाळपर्यंत सदर भगदाड दाबण्यात आले नसल्याचा आरोप प्रत्यक्ष ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केला. प्रशासनाकडून जखम हाताला मलम पट्टी कपाळाला अशी उपाययोजना केल्याचा प्रत्यय आल्यामुळे प्रशासनाबद्दल ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. गावातील विशाल नरवाडे या युवकाने धरणाच्या भिंतीला भगदाड पडले व त्यातून पाणी येत असल्याचे सांगितले होते. सदर बाब प्रशासनाला माहिती झाल्यानंतर बोगदा दाबण्याची कारवाई सुरू झाली. गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्याचदरम्यान पाटबंधारे विभागाकडून बोगदा बुजवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली. रात्री उशिरा दाबण्यासाठी पोकलँड जेसीबी दाखल झाले. महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांनीसुद्धा प्रकाश व्यवस्था करून ठेवली. परंतु बोगदा दाबणेऐवजी सांडव्यातून पाणी काढण्यासाठी वेळ घालवण्यात आला. सकाळपर्यंत बोगदा दाबण्यात आला नव्हता. प्रशासनाकडुन नैवेद्य दाखवण्याचे काम करण्यात आले. बोगदा दाबला नसल्याचा आरोप शुभंम ऊर्फ बंडु सरकटे, विजय सरकटे, योगेश सरकटे यांच्यासह ग्रामस्यानी केला आहे.