– विद्यार्थी, पालकांत संतापाची लाट; वाहकावर कारवाईची मागणी!
लोणार (वाजिद खान) – एसटी महामंडळ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात काही चालक आणि वाहकांच्या हलगजीमुळे प्रवाशांना दिला जाणारा प्रवासाचा हक्क डावलला जातो आहे. अशीच एक धक्कादायक घटना लोणार येथे आज, दुपारी ४ते ४:३० वाजेदरम्यान घडली असून, ज्यामुळे विद्यार्थिनीसह तिच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नागपूर ते परतूर ही बस लोणार येथून परतूरकडे तळणीमार्गे जाणारी दुपारी ४:४५ वाजता सुटली. सुलतानपूर येथे शिक्षण घेणारी शीतल राऊत ही विद्यार्थिनी रोजच्या प्रमाणे बस पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. बस जवळ येताच तिने हात दाखवून बस थांबली देखील. मात्र, जेव्हा तिने वाहकाकडे बसमध्ये प्रवेशासाठी विचारणा केली, तेव्हा धक्कादायक उत्तर मिळाले – ‘ही गाडी तळणी येथे थांबत नाही’, असे स्पष्ट शब्दात सांगून तिला नकार देण्यात आला. शीतलने लगेचच लोणार आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधून वाहतूक नियंत्रकांशी बोलणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बस अधिकृतपणे थांबते. ही बाब आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित असताना घडली. बस मध्ये जागा असतानाही कंडक्टर ने विद्यार्थिनीला बसमध्ये प्रवेश नाकारला. सर्व प्रवाशांसमोर ही घटना घडली. ही विद्यार्थिनी दररोज तळणीहून सुलतानपूर येथे शाळेत जाते. ग्रामीण भागात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एसटी हा महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे. मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. ही घटना केवळ विद्यार्थिनीशी संबंधित नसून संपूर्ण महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. एसटी महामंडळाला तोटा होत असताना देखील, प्रवाशांना न घेण्याचा कारभार चालू राहिला तर या संस्थेच्या सक्षमीकरणाबाबत मोठे प्रश्न निर्माण होतात.
या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाचे वातावरण असून, ग्रामस्थ व पालक वर्गातून जोरदार मागणी करण्यात येत आहे की, सदर घटनेची चौकशी करून संबंधित चालक व वाहकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला, महिला प्रवाशाला किंवा नागरिकाला अशा प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी प्रशासनाने द्यावी. ही केवळ एक घटना नाही, तर एसटी व्यवस्थेच्या जबाबदारीचा आरसा आहे. प्रवाशांचा विश्वास मिळवायचा असेल तर सेवा ही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवावी लागेल.